coronavirus : पुण्यातील गाेगटे शाळा झाली 153 बेघरांचे निवासस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 06:56 PM2020-03-30T18:56:47+5:302020-03-30T18:57:52+5:30
लाॅकडाऊनमुळे पुण्यातील बेघरांचे हाल हाेत असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था आता पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.
पुणे : इथं राहायला लय मस्तय बाबा ! आम्ही रस्त्यावर होतो आणि तिथं कायबी खायला मिळत नव्हतं. आता इथं आणलंय तर राहायला बी मिळतंय आणि खायलाबी मिळतंय. एकदम मस्त वाटतंय आता. मी गेल्या तीस वर्षांपासून पुण्यात हाय. पण आता या कोरोनामुळं पहिल्यांदाच छान राहायला मिळतंय ! या भावना आहेत रस्त्यावर राहणाऱ्या आजोबाचे ! या बेघर असणाऱ्यांसाठी गोगटे प्रशाला निवासस्थान बनले असून, त्यांना इथे छान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेतर्फे नारायण पेठेतील कै. वा. ब. गोगटे प्राथमिक विद्यालयात रस्त्यावर राहणाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. तिथे त्यांना एकत्र ठेवले असून, जेवणाची सोय देखील केली आहे. आतापर्यंत या ठिकाणी १५३ जणांना आसरा देण्यात आला आहे.
कोरोनामुळे शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. पण रस्त्याच्याकडेला राहणारे तिथेच राहत होते. त्यामुळे त्यांना पुणे महापालिकेतर्फे निवारा केंद्रात ठेवण्यात येत आहे. सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोगटे प्रशालेत १५३ बेघर असणाऱ्यांना एकत्र ठेवले आहे. सर्वजण तिथेच झोपत असून, जेवणही तिथेच करत आहेत. सर्वजण एकमेकांच्या सोबत असल्याने इथे संसर्ग होण्याची शक्यता आहे. कारण शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांही त्यांना जेवण आणून देत आहेत. त्यांचा संपर्क सर्वांशी येत आहे. यामधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत असून, विविध खेळ खेळत आहेत. काही जण पत्ते खेळतात, तर काही जण चल्लास खेळतात. चल्लास खेळण्यासाठी काही मिळत नसल्याने शेंगदाणेचा वापर करून खेळ मांडत आहेत. या लोकांची झोपायची सोय एकाच ठिकाणी रांगेत केली आहे. पुणे महापालिकेतर्फे त्यांना दररोज पुरीभाजी, पुलाव, भात, पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे सर्वजण अतिशय आनंदात असले तरी कोरोनाबाबतची दक्षता मात्र ते घेताना दिसून येत नाहीत.
पुणे महापालिकेतर्फे येथील सर्वांना दररोज जेवणाची सोय केलीय. पाण्याची सोय आहे. काही संस्थाही आणून देतात. त्यांची योग्य ती काळजी पालिकेकडून घेतली जात आहे. अजून काही बेघरांना इतर ठिकाणी ठेवलंय.
- महापालिका कर्मचारी, गोगटे प्रशाला
859 बेघरांना पालिकेने दिला निवारा
पुणे शहरातील बेघर नागरिकांना पुणे महापालिकेने निवारा उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे 859 बेघर नागरिकांना पुणे मनपाच्या शाळा, रात्रनिवारा केंद्रात आसरा देण्यात आला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांना पुणे स्टेशन, बोपोडी, येरवडा, नवीपेठ त्याचबरोबर अन्य भागातील केंद्रात आसरा देण्यात आला आहे. त्यांना अंथरुण-पांघरुण उपलब्ध करून देण्यात आले असून, या सर्व नागरिकांकरिता चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था क्षेत्रीय अधिकारी स्थानिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने करून देण्यात आली आहे. पालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी ही माहिती दिली.