Coronavirus Pune :पुण्यातील जम्बो कोव्हिड रुग्णालय अखेर होणार बंद !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:57 PM2021-06-21T12:57:43+5:302021-06-21T13:00:07+5:30
रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने घेतला निर्णय
पुण्यातील जम्बो कोव्हीड रुग्णालय अखेर बंद होणार आहे.कोरोनाची साथ आटोक्यात आल्यामुळे आता कोव्हिड सेंटर मधले रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर हे रुग्णालय बंद केले जाणार आहे.
पुण्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबई पाठोपाठ पुण्यातही सीओईपी कॉलेजच्या ग्राउंड वर जंबो कोव्हीड सेंटर उभारण्यात आले. दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागली तेव्हा पुन्हा एकदा हे रुग्णालय सुरू करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांमध्ये साधारण 3000 रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तसे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांवरचा भार कमी व्हायला लागला होता. याच पार्श्वभूमीवर जम्बो कोव्हिड रुग्णालयातील प्रवेश बंद करण्यात आले होते. आता पुढच्या ७ ते ८ दिवसांत हे रुग्णालय बंद होणार आहे.
याविषयी लोकमतशी बोलताना पुणे महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, "रुग्णालयाची मुदत 22 जून पर्यंत असली तरीदेखील आम्ही तेथील रुग्णांची परिस्थिती पाहून डिस्चार्ज मिळेपर्यंत हे रुग्णालय सुरू ठेवू. नंतर ते बंद करण्यात येईल. दरम्यान हे रुग्णालय जरी बंद होणार असलं तरी इतर रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढले तर बेड ची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे जंबो बंद झाले तरी नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही."