Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:17 PM2020-03-19T13:17:44+5:302020-03-19T13:21:16+5:30

मुंबई विमानतळावर उतरल्यावर ‘होम क्वारंटाईन’चा स्टॅम्प मारलेला नागरिक घरी पोहोचेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो.

Coronavirus : .. the risk accept on the occasion of corona virus spread ? | Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य?

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य?

Next
ठळक मुद्दे नागरिकांचे प्रश्न : प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा

पुणे : केंद्र सरकारच्या यादीत समाविष्ट नसलेल्या देशांतून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली असेल तर काय? त्यांच्यामार्फत कोरोनाचा उद्रेक होण्याची चिन्हे असताना अशा पर्यटकांबाबत केंद्रातर्फे काय पावले उचलली जात आहेत? मुंबई विमानतळावर उतरल्यावर ‘होम क्वारंटाईन’चा स्टॅम्प मारलेला नागरिक घरी पोहोचेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो. अशी जोखीम पत्करणे धोक्याचे नाही का? घरातील विलगीकरणाची प्रवाशांकडून प्रभावी अंमलबजावणी होते का? असे अनेक प्रश्न कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने उपस्थित केले जात आहेत. चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांना केंद्र सरकारने कोरोनाबाधित देश घोषित केले आहेत. परंतु, राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांमध्ये या देशाव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता, ‘केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सात देशांच्या यादीत आणखी तीन देशांचा समावेश केला आहे. या देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक तपासणी विमानतळावर करण्यात येते. परंतु, त्यांना क्वारंटाईन करता येत नाही. आम्ही केंद्र सरकारकडे सर्वच देशांमधून येणाऱ्या नागरिकांबाबत क्वारंटाईनचे धोरण राबवता येईल का? याबाबत विचारणा करीत आहोत. सद्य:स्थितीत आम्ही केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहोत,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुंबई विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांचे ‘टेंपरेचर’ तपासले जात आहे. काही पर्यटकांकडून ‘सेल्फ डिक्लरेशन’चा अर्ज भरून घेऊन, ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का हातावर मारून सोडून दिले जात आहे. बुधवारी पहाटे जर्मनीतून दुबईमार्गे मुंबई विमानतळावर दोन व्यक्ती आल्या. त्यांपैैकी एका व्यक्तीचे वय ६० हून अधिक असल्याने व इतर आजारांची पार्श्वभूमी असल्याने डॉक्टरांच्या टीमकडून पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील रुग्णालयात दोन-तीन दिवसांसाठी तिला दाखल करून घेतले आहे. दुसऱ्या व्यक्तीचे केवळ ‘टेंपरेचर’ तपासून हातावर शिक्का मारला आणि १४ दिवसांसाठी घरीच विलगीकरण करून राहण्यास तिला सांगितले. ती व्यक्ती कॅबने मुंबईहून पुण्याला आली. ‘होम क्वारंटाईन’चा नेमका अर्थ काय? संबंधित व्यक्तीने इतरांच्या संपर्कात येण्यास परवानगी आहे की नाही? अशा शंकाचे निरसन आरोग्य विभागाकडून केले जावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई आणि पुणे विमातळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जाणाऱ्या नागरिकांतर्फे कॅबचालक, त्यांचे नातेवाईक यांना कोरोनाची बाधा होऊ शकते. घरात विलगीकरण करून राहण्याबाबत नागरिकांकडून प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विमानतळाजवळच्या उपलब्ध इमारतींमध्ये प्रवाशांना क्वारंटाईन करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्यास कोरोनाचा उद्रेक रोखता येईल, अशा स्वरूपाचे निवेदन महापौैर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ००० जगभरात कोरोनाचा प्रसार शंभराहून अधिक देशांमध्ये झाला आहे. त्यातही चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या सात देशांमधून येणाऱ्या  नागरिकांची कसून तपासणी विमानतळावर करण्यात येते. परंतु, याव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर प्राथमिक तपासणी करून त्यांना सोडण्यात येते. केंद्र शासनाच्या प्रोटोकॉलनुसार सर्वाधिक कोरोनाबाधित सात देशांमधील प्रवाशांनाच आयसोलेशन करता येणे शक्य असल्याने इतर देशांमधील प्रवासी या प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Coronavirus : .. the risk accept on the occasion of corona virus spread ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.