Coronavirus: चीनमध्ये आता लक्षणे दिसत नसलेल्या बाधितांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:31 AM2020-03-31T02:31:57+5:302020-03-31T06:28:12+5:30
दोन आठवड्यांपूर्वी हेनान प्रांतातील ५९ वर्षीय श्रीमती वँग या वर्गमित्र डॉ. झँग यांना भेटल्या होत्या.
पुणे : कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकरण चीनमधील हेनान प्रांतामधे उघड झाले आहे. कोरोना विषाणूची बाधा असलेला एक व्यक्ती ठणठणीत असून, त्याच्यामुळे मात्र निरोगी व्यक्ती आजारी पडल्याचे उघड झाले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी हेनान प्रांतातील ५९ वर्षीय श्रीमती वँग या वर्गमित्र डॉ. झँग यांना भेटल्या होत्या. ते दोघे बसने शहराबाहेर गेले. सोबत तीन वेळा जेवणही घेतले. झँग याला भेटल्यानंतर आठवडाभराने वँग यांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर दोन दिवसांनी अंगात ताप भरला. त्यांची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक प्रसारामुळे बाधित झालेल्या त्या त्यांच्या प्रांतातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
त्यानंतर हेनानच्या आरोग्य विभागाने त्याबाबत तपास करून वँग यांना झँग यांच्यामार्फत कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर झँग आणि दोन डॉक्टरांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. मात्र, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. या तिघांनी १३ मार्च रोजी एकत्र भोजन केले होते. दक्षता म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाने स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार शून्यापर्यंत खाली आल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता हा धोका समोर आला आहे.
झँग यांच्या सारखे आजाराची कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या काही व्यक्ती असू शकतील. ज्यांना स्वत:ला आजार होणार नाही. मात्र, ते विषाणूचा प्रसार करीत राहतील. गार्डियन या प्रसिद्ध वृत्तपत्राने त्याबाबतचे वृत्त दिले आहे.