पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रारूप प्रभागरचनेचा अंतिम आराखडा त्रिसदस्यीय समितीकडून सोमवारी निवडणूक आयागोला सादर झाला आहे. प्रारूपचा प्रस्ताव तयार करताना गठ्ठा मतदानाचा भाग कापाकापी झाल्याने अनेक नगरसेवकांना धक्का देण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची झोप उडणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २०१७मध्ये होणार असून, प्रारूप प्रभागरचना तयार झाली आहे. आराखड्यात गावठाण आणि वाड्या वस्त्यांच्या भागांची तोडफोड केली आहे. विद्यमान नगरसेवकांची गठ्ठा मते असलेला भाग दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याने विद्यमान नरसेवकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतर पक्षांना झटका दिला आहे. महापालिकेने सादर केलेला प्रारूप आराखडाच अंतिम ठरणार असून, सत्तेसाठी काही नगरसेवकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आरक्षणाच्या प्रारूपावरही खल झाला असून, तेही निश्चित केले आहे, याबाबत निवडणूक विभागाने कमालीची गोपनीयता बाळगली आहे. प्रभागरचनेबाबत महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून सर्वच पक्षांचे पदाधिकारी आपापल्या परीने तर्कवितर्क लावत आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक असणारे कार्यकर्ते आणि पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्यांच्या निवडणूक विभागात खेटी वाढल्या आहेत. मात्र, याबाबत निवडणूक विभागाकडून गोपनीयता बाळगली जात आहे. त्यामुळे इच्छुकांना निराश व्हावे लागत आहे. तर नेत्यांच्या संबंधित असणारे कार्यकर्ते आपला प्रभाग कसा झाला, कोणाचा भाग कोणाला जोडला, याची चर्चा करीत आहेत. प्रभागरचना बदलण्यात आल्याने त्याचा फायदा कोणास होणार, याबाबतही चर्चा रंगली आहे. महापालिकेच्या वतीने तयार केलेला आराखडा निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी तयार करून आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या परवानगीने हा आराखडा त्रिसदस्यीय समितीकडे दाखल केला होता. त्यास विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या त्रिसदस्यीय समितीने हा प्रस्ताव अंतिम केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप तयार केले की नाही, याची तपासणीही केली. त्यानंतर प्रारूप मंजूर करून त्रिसदस्यीय समितीने प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर वाघमारे यांनी सोमवारी प्रारूप आराखडा मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला. (प्रतिनिधी)ब्लॉक तोडल्याची चर्चा प्रारूप आराखड्यात सीमांकन केल्यानंतर लोकसंख्येच्या आधारे आरक्षणे निश्चित होणार आहेत. त्यानुसार एस.सी. आणि एस.टी., ओबीसी संदर्भातील जागाही निश्चित झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना ठरविताना जनगणनेचे ब्लॉक आणि गुगल मॅपचा आधार घेण्याचे निर्देश होते. त्यानुसार आराखडा तयार केला आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, यात काही ब्लॉक तोडल्याची चर्चा आहे. सूचना आणि हरकतींचे नियोजन विरोधी पक्षातील नगरसेवकांचा बराच परिसर दुसऱ्या प्रभागाला जोडल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रारूपाबाबत मोठ्या प्रमाणावर सूचना आणि हरकती देण्याचे नियोजन विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केले आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकाचा गठ्ठा मतांचा भाग दुसऱ्या प्रभागात जोडल्यास सत्ताधाऱ्यांना फायदा होईल, अशी राजकीय खेळी खेळली गेली आहे.३२ प्रभागांची रचनाप्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार केला आहे. बहुसदस्यीय चारसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांचा प्रारूप आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. त्रिसदस्यीय समिती आरक्षण तपासणी केली आहे. प्रभागाची नावे प्रचलित गावांच्या नावानुसार पूर्वी प्रभागांना नावे देताना गाव, परिसरातील महत्त्वाचे ठिकाण याचा विचार केला जात होता. मात्र, नावाचे वाद टाळण्यासाठी प्रभागांना अ, ब, क, ड असे क्रमांक द्यावेत, अशीही सूचना केली आहे.
नगरसेवकांची उडणार झोप?
By admin | Published: September 13, 2016 1:16 AM