भारताचे योग्य आणि चोख उत्तर :निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 07:00 PM2019-02-26T19:00:31+5:302019-02-26T19:02:42+5:30

हवाई दलाने  मध्यरात्री केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली. हवाई दलाच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीही भारताच्या या मोहिमेचे स्वागत केले आहे. 

The correct and perfect answer by India: The reaction by retired army officers | भारताचे योग्य आणि चोख उत्तर :निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया 

भारताचे योग्य आणि चोख उत्तर :निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया 

Next

पुणे : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडण्यात भारतीय हवाई दलाला यश आले आहे. हवाई दलाने मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान केलेल्या कारवाईत जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर आणि मेहुणा युसूफ अजहर खात्मा झाला. हवाई दलाने  मध्यरात्री केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली. हवाई दलाच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीही भारताच्या या मोहिमेचे स्वागत केले आहे. 

अत्यंत परिपक्वपणे पाकिस्तानला उत्तर  :निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले वचन अत्यंत परिपक्वपणे पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम केले आहे. मागच्या वेळी आपण एलओसीजवळ एकदा कारवाई केली आहे. यावेळी ती केली असती तर थोडे अवघड झाले असते. त्यामुळे हवाई दलाने पाकिस्तानी हद्दीत जाऊन सानान्य नागरिकांना हानी न पोहचविता दहशतवाद्यांचे तळ उद्ध्रवस्त केले हे स्पृहनिय आहे.  कुठलाही कोलायट्रल डॅमेज न करता, अत्यंत योग्य निर्णय घेणे, लक्ष्यांची उत्तम निवड करणे आपल्याला पाहिजे तसा हल्ला करणे हे काम आज भारतीय हवाई दलाने करून दाखवले आहे. पाकिस्तानने सुरूवातीला हल्ला झाला नाही असे सांगायचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही भारतीय विमानांना पिटाळून लावले असे सांगितले मात्र, त्यात काही तथ्य नाही हे आता दिसून आले आहे. खैबर पैक्तून मध्ये दहशतवाद्यांचा मोठे कॅम्प होते याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाला होती. यामुळे अतिशय संयमाने १० दिवसानंतर हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानची भारतावर  हल्ला करण्याची क्षमता नाही. मात्र, नक्कीच ते काही तरी करतील. भारतीय सैन्य दले अलर्ट असून त्यांच्या कुठल्यानी हल्याला तोंड देण्यास ते सक्षम आहेत. 

 

भारताच्या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांवर वचक :निवृत्त ब्रिगेडिअर  हेमंत महाजन 

भारतीय हवाई दालाच्या १२ मिराज विमानांनी पाकिस्तानमधील बालाकोट सेक्टरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी तळावर जवळपास हजार किलोचे लेझर गायडेड बॉम्ब टाकून हे तळ उद्ध्वस्त केले. या घटनेत २०० ते २५० दहशतवादी मारले गेले, असा अंदाज आहे. तसेच जैशचा म्होरक्या मसूद याच्या नातेवाईकांचाही त्यात समावेश आहे. जेव्हा पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानला भारत प्रत्युत्तर देईल, हे माहिती होते. यामुळे पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील दहशतवादी तळ जे एलओसीपासून जवळ असायचे त्यांना आणखी मागे नेले. जेथे भारतीय विमानांनी हल्ला केला हा भाग काश्मिरयुक्त पाकिस्तानमध्ये नसून पाकिस्तानमधील खैबर पक्तूनावा येथे करण्यात आलेला आहे. पंतप्रधान इम्रान खान याआधी या प्रांताचे मुख्यमंत्री होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले. २० मिनिटांत भारतीय विमाने हल्ला करून परत आली. पाकिस्तानी विमानांनी भारतीय विमानांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. 

 लक्षात हे घ्यायला हवे, की दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचे हवाई दल हे अलर्टवर होते. तसेच पाकिस्तानची पेट्रोलिंग करणारी विमाने तसेच अर्ली एअर बॉर्न अर्ली वॉर्निंग अ‍ॅन्ड कंट्रोल सिस्टीमही विमानेही अवकाशात होती. मात्र, असे असतानाही भारतीय हवाई दल त्यांना चुकवून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून आले. यामुळे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे, की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हवाई दलाचा वापर हा पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात आला आहे. यापूर्वी अनेकदा अणुयुद्धाच्या भीतीमुळे आपण वायुदलाचा वापर करू शकत नाही, असे म्हणणारे अनेक होते. मात्र, या कारवाईमुळे सर्वांना खोटे ठरविण्यात आले आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे मोठे नुकसान केले. परंतु यामुळे दहशततवाद थांबेल का? जैश-ए-मोहम्मद संघटना बंद पडेल का? याचे उत्तर आहे नाही. कारण प्रत्येक वर्षी दोन ते अडीच हजार दहशतवादी तयार करण्याची क्षमता पाकिस्तानकडे आहे. यामुळे ही लढाई पुढे चालूच राहील. यातून आपण संपूर्ण जगाला एक मेसेज दिला आहे, की जर आमच्यावर कुणी हल्ला केला तर आमच्याकडील पारंपरिक शक्ती आहे, त्याचा वापर करून आम्ही आमच्या देशाचे रक्षण करू शकतो. याचे सर्व राष्ट्रांनी याचे स्वागत केले आहे. सुरुवातीला पाकिस्तानी सरकाने हा हल्ला झाल्याचे नाकारले; मात्र त्यांच्या संसदेने हा हल्ला म्हणजे पाकिस्तानचा अपमान असल्याचे मान्य केले. तेथील प्रसारमाध्यमांनीही पाकिस्तान याला कसे उत्तर देईल, याविषयी मोठी चर्चा आहे. पाकिस्तानकडे सैन्याचा वापर करण्याची क्षमता आहे. परंतु लक्षात हे घ्यायला हवे, की याआधी ८५ टक्के सैन्य भारत पाकिस्तान सीमेवर असायचे; मात्र आता त्यापैकी ५० टक्के सैन्य हे वझिरीस्तान, बलुचिस्तान, सिंध प्रांतातील त्यांच्याच लोकांसोबत अ‍ॅन्टीटेरसिस्ट आॅपरेशन करण्यात गुंतले आहे. याबरोबरच अफगाणिस्तानची सीमा जी पाकिस्तानला लागली आहे, तीसुद्धा अशांत असल्याने पाकिस्तानचे सैन्य त्या ठिकाणीही गुंतले आहे. याआधी पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या साह्याने इराणच्या सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यात त्यांच्या सैन्याचे नुकसान झाले होते. याचा बदला म्हणून इराणच्या सैन्याने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला. पाकिस्तानचे हवाई दल आपल्याविरुद्ध कारवाई करू शकेल का, असा प्रश्न विचारला जातो. त्यांच्यात क्षमता आहे. मात्र त्यांची विमाने आपल्या हद्दीत आल्यास ती परत जाऊ शकणार नाहीत. या हल्ल्यामुळे दहशतवादी चिडले असून आणखी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे. 

 

दहशतवादी हल्ला करण्यापुर्वी आता पाकिस्तानला १०० वेळा विचार करावा लागेल :निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर

भारतान केलेल्या हवाई हल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांच्या साह्याने भारतावर हल्ले करून भारताला नामोहरमकरू पाहणा-या पाकिस्तानला चांगली अद्दल घडली आहे. कुठलाही दहशतवादी हल्ला करतांना   आता पाकिस्तानला शंभरवेळा विचार करावा लागेल. 

  पाकिस्तानला हा धडा शिकवायलाच पाहिजे होता.  जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता. तेव्हा अनेक सामान्य नागरिकांना त्यात जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर मी माझ्या अनेक व्याख्यानात   दहशतवाद्यांवर हवाई हल्ला करावा असे ठाम पणे सांगत होतो. तसेच हा हल्ला घटनेनंतर चार तासातच व्हायला पाहिजे. त्यानंतरच त्यांना अद्दल घडेल. ज्या ठिकाणी हल्ले झाले तो भाग चांगल्या परिचयाचा आहे.  उरीच्या पुढे चकोटी आहे आणि तेथून उत्तर पश्चिमेला मुजफ्फराबाब आहे. येथून वायव्य दिशेला दोन पर्वतरांगा ओलांडून बालाकोट आहे.   बालाकोटवर भारतीय हवाई दलाने केलेल्या  हल्यामुळे नक्कीच ते हादरले असतील. कारण पाकिस्तानच्या आत हा प्रदेश आहे. त्या ठिकाणी जाऊन तेथील त्यांच्या मुख्य ट्रेनिग कॅम्पवर  हल्ला करून त्याचा समुळ नायनाट करणे ही मोठी गोष्ट आहे. याचे परिणाम अनेक दिवस अनेक महिने उमटत राहिल. कारण भारत येवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ला करेल असे पाकिस्तानला कधी वाटलेच नव्हते. चार वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईकचीही अपेक्षाही त्यांनी केली नव्हती.  सीमेवरील नियंत्रण रेषेवर आम्ही या आधी कारवाया करत आलो आहोत. सीमारेषेच्या आत अर्धा ते एक किलोमीटर जाऊन दहशतवादी तळ आम्ही नष्ट केले आहे. अगदी शस्त्रुच्या गोटात जाऊन या कारवा केल्यामुळे पाकिस्तानने धडा घ्यायला हवा होता. भारतातील आताच्या सरकारचे धोरण हे खंबीर आहे. थेट कारवाई करण्यास ते मागे पुढे पाहणार नाही हे त्यांनी समजायला हवे होते. पण सर्जिकल स्ट्राईकपासूनही ते काही शिकू शकले नाही. कारण त्यांची मानसिकताच तशी आहे. पाकिस्तानी पंजाबी मुस्लिम भारतीय सैन्याला कमी लेखतात. त्यांची गुर्मी काही जात नाही. मात्र, या हल्यामुळे त्यांचा चांगली अद्दल घडली आहे. दोन्ही देशांच्या ताकदीचा विचार केला तर भारत हा पाकिस्तानपेक्षा सरस आहे. १९४७ पासून पाकिस्तानने भारताबद्दलची भूमिका ही बदलती ठेवली आहे. कारण थेट युद्धात आपण भारताला हरवू शकत नाही हे त्यांना चांगले माहित आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या साह्याने भारतीय सैन्यावर हल्ले करून त्यांना नामोहरण करू. यामुळे थेट युद्धही होणार नाही आणि सारखे हल्ले करून सैन्याचे खच्ची करू. मात्र, आपण आतापर्यंत जो विचार करत होतो तो चुकीचा आहे. भारत आता पूर्वीचा राहिला नाही. हे त्यांना उमगले आहे. नवा भारत आपल्या पुढे असल्यामुळे  आपल्यातच बदल करावा लागेल हे या हल्लामुळे पाकिस्तानला समजुन चुकले आहे.  

Web Title: The correct and perfect answer by India: The reaction by retired army officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.