लोणीभापकरमधील विकासकामांत गैरव्यवहार
By admin | Published: January 12, 2017 01:46 AM2017-01-12T01:46:48+5:302017-01-12T01:46:48+5:30
बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील सहा सार्वजनिक कामांसाठी ४३ लाख रुपयांचा निधी आला होता. मात्र, ही सर्व कामे अपूर्ण
मोरगाव : बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील सहा सार्वजनिक कामांसाठी ४३ लाख रुपयांचा निधी आला होता. मात्र, ही सर्व कामे अपूर्ण असून निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यामध्ये ठेकेदाराने ग्रामसेवकांना हाताशी धरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी विद्यमान ५ ग्रामपंचायत सदस्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोणीभापकर-भोसलेवस्ती रस्त्यासाठी ११ लाख ५० हजार रुपये, शिदेंमळा रस्ता नऊ लाख रुपये, दलितवस्ती सभागृहसाठी नऊ लाख रुपये, मदने - शिंदेमळा भापकरवस्ती अंगणवाडीसाठी सहा लाख रुपये, प्राथमिक शाळा संरक्षक भिंत ४ लाख पन्नास हजार रुपये, स्मशानभूमी सुशोभीकरण तीन लाख रुपये.
याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, बारामती गटविकास अधिकारी यांना विद्यमान सदस्य ज्योती विजय बारवकर, सुदाम अप्पा मदने, दत्तात्रय रघुनाथ जगदाळे, रूपाली सोमनाथ पवार, लक्ष्मी कांतिलाल मदने यांनी दिलेल्या निवेदनात ही कामे निकृष्ट दर्जाची व अपूर्णावस्थेत असल्याने ठेकेदार, ग्रामसेवक व सरपंचांनी संगतमताने गावासाठी आलेला निधीचा गैरवापर केला असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाकडून या कामांसाठी अद्याप अंतिम टप्प्यासाठी निधी आला नाही. तर काही कामे अंतिम टप्प्यात असल्याने केलेले आरोप खोटे आहेत. कामांचा दर्जा चांगला आहे, असे ग्रामसेवक नितीन शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)