कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण : पुणे, मुंबई व कोल्हापूरमधील एटीएमचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:30 AM2018-08-18T01:30:38+5:302018-08-18T01:31:22+5:30
कॉसमॉस बँकेचा पेमेंट सर्व्हर हॅक करून पैसे काढण्यात आल्या प्रकरणात पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमधील एटीएमचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे - कॉसमॉस बँकेचा पेमेंट सर्व्हर हॅक करून पैसे काढण्यात आल्या प्रकरणात पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमधील एटीएमचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हैदराबाद आणि इंदूरमधील देखील काही एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्यात आले आहे.
पेमेंट सर्व्हर हॅक करून कॉसमॉस बँकेतून सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये २८ देशांत १२ हजार ट्रान्झक्शन एटीएम सेंटरमधून करण्यात आले आहेत. एटीएमच्या माध्यमातून सुमारे ७६ कोटी रुपये लंपास करण्यात आले आहे. तर, भारतात करण्यात आलेल्या अडीच हजार ट्रान्झॅक्शनमध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, इंदूर या शहरांसह देशभरातील महत्त्वपूर्ण शहरांतील एटीएमचा वापर पैसे काढण्याकरिता करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पुण्यातील चांदणी चौक, नरपीतनगर चौक या ठिकाणच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित इसम घटनेच्या दिवशी पैसे काढताना दिसून आले असून, त्यादृष्टीने संशयितांची माहिती काढण्याचे काम तपास पथक करीत आहे.
पैसे काढण्यात आलेल्या एटीएम सेंटरची यादी तयार करून त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याकरिता तपास यंत्रणा कामाला लागली आहे. सायबर क्राईम सेलचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कॉसमॉस बँकेच्या अधिकाºयांकडून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली आहे.
गुन्ह्याचे वेळी नेमकी कोणत्या ठिकाणावरून आणि किती वाजता व्यवहार झाला आहे, याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध असून त्याआधारे पोलीस आरोपींचा माग काढता येईल का, याबाबत चाचपणी करीत आहे.
खासगी सायबरतज्ज्ञांची मदत
कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी खासगी सायबर तज्ज्ञांची देखील मदत घेतली आहे. कॉसमॉस प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकात सायबर तज्ज्ञांचा समावेश आहे. सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकात तीन पोलीस निरीक्षक, कर्मचारी आणि सायबर गुन्हेविषयक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग आहे.