कात्रज घाटात चोरट्यांनी तीक्ष्ण शस्त्राच्या धाकाने दाम्पत्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 04:23 PM2018-05-15T16:23:57+5:302018-05-15T16:23:57+5:30
कात्रज घाटात तपासणी नाक्याजवळ वेगवेगळ्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी मोटार थांबवून शास्राचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटले.
पुणे : मोटारीतून निघालेल्या दाम्पत्याला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा दोन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी भारती विद्याापीठ पोलिसांकडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप शिवराम भोसले (वय ५२,रा.विंझर, ता.वेल्हा, भोर) यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले राज्य परिवहन महामंडळात वाहक आहेत. भोसले दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भोसले दाम्पत्य मोटारीतून गावी निघाले होते. कात्रज घाटात तपासणी नाक्याजवळ वेगवेगळ्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी मोटार थांबविली. भोसले आणि त्यांची पत्नी जयश्री यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. जयश्री यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, भोसले यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड, राज्य परिवहन मंडळाचा वाहक परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड असा माल लुटून चोरटे फरार झाले.
या घटनेनंतर घाबरलेल्या भोसले दाम्पत्याने भारती विद्याापीठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. लुटमारीत पाच चोरटयांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.