कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाज अडीच तासांच्या एकाच शिफ्टमध्ये चालणार; मुंबई उच्च न्यायालयाची नवीन नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 09:34 PM2021-04-16T21:34:01+5:302021-04-16T21:35:50+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वेळेत बदल.....
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजाच्या वेळा आणखी कमी करण्यात आल्या असून, आता. दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये अडीच तासच कामकाज चालणार आहे. याचा परिमाण खटल्यांच्या सुनावणी व पक्षकारांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि१९) येथील जिल्हा न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी 1.30 अशा एक शिफ्टमध्ये अडीच तास सुरू राहणार आहे. तसेच या काळात ५० टक्केच कर्मचारी उपस्थित असणार आहेत.मात्र, सर्व न्यायाधीशांनी उपस्थित राहावे, असे उच्च न्यायालयाच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये सुरू होते. त्यात जोडून आलेल्या सुट्या व उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिरिक्त सुट्यांमुळे सोमवार ते शनिवारपर्यंत (दि.१२ ते १८) कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारपासून न्यायालये सुरू झाल्यानंतर एकच शिफ्टमध्ये कामकाज चालणार असून जी प्रकरणे महत्त्वाची नाहीत त्यांना पुन्हा तारखांवर तारखा मिळण्याची शक्यता आहे. याकाळात केवळ महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी होणार आहे. तसेच त्याच खटल्यातील पक्षकार, वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत.
-----------------------------------------
प्रत्येक शनिवारी कामकाज बंद :
वीकेंड लॉकडाऊनमुळे प्रत्येक शनिवारी न्यायालयास देखीस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी कामकाज बंद राहणार आहे. ज्या दावे किंवा खटल्यांमध्ये युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्या प्रकरणांचे निकाल वा आदेश पारित केले जाणार आहेत.
---------------------------------------------------------
’न्यायालयात विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून तारीख व महत्त्वाचे काम असणा-या वकील-पक्षकारांना न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळावी. न्यायालयीन कामकाज नेमके कसे चालणार याबाबत येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे आदेश येतील- अॅड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन