कोरेगाव भीमा : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चौफुला (ता. शिरूर) कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल होवून ब-या होणा-या प्रत्येक रुग्णाने आता आपल्या घरापुढे १० झाडे लावण्याची, जगविण्याची शपथ घ्यायची आणि मगच डिस्चार्ज घ्यायचा पथदर्शी रिवाज या सेंटरचे प्रमुख माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सुरू केला आहे.
दाखल १५० रुग्णांपैकी सर्वात पहिल्या ब-या झालेल्या रुग्ण वर्षा शिवले यांना १० झाडे देत या उपक्रमाचा प्रारंभ शिवले यांनी डॉ. नवीन व डॉ. धरती काळे या दाम्पत्यांच्या हस्ते नुकताच केला.
आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रेरणेने व राव-लक्ष्मी फाउंडेशनच्या सहकार्याने चौफुला (ता.शिरूर) येथे दहा दिवसांपूर्वी २०० रुग्णांचे कोविड केअर सेंटर गणेश शेळके यांच्या मयुरी मंगल कार्यालयात प्रफुल्ल शिवले यांनी सुरू केले. पहिल्याच आठवड्यात १०० रुग्णांची भरती झालेल्या या सेंटरमध्ये सद्यस्थितीत १५० रुग्ण दाखल आहेत. महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, आंघोळीला गरम पाणी, योगोपचार, उत्तम नाष्टा, आयुर्वेदानुसार जेवण, करमणुकीसाठी स्क्रिनची सुविधा असा उत्तम रुग्ण-बडदास्त या सेंटरमधून आता रुग्ण बरे होवून घरी जावू लागल्याने जे रुग्ण सुरवातीला ऑक्सिजनअभावी दाखल झाले होते. त्यांना घरी जाताना त्यांनी आपल्या घरापुढे १० झाडांची लागवड, जोपासना करण्याची शपथ आयुर्वेदीक उपचार करणारे डॉ. नवीन काळे व त्यांच्या पत्नी धरती काळे देत आहेत.
चौफुला (ता. शिरूर) येथील प्रफुल्ल शिवले यांच्या कोविड केअर सेंटरमधील पहिल्या ब-या झालेल्या रुग्ण वर्षा शिवले यांना दहा झाडांचे वाटप करताना डॉ. नवीन व डॉ. धरती काळे दांपत्य.