पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटमध्ये इमारतीला लागलेली आग ही भीषण स्वरूपाची होती. आगीची माहिती समजताच आमच्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने ही आग ज्या ठिकाणी लागली तिथे कोरोना लसीचे उत्पादन सुरु नव्हते. बीसीजीसह इतर लस तयार होत असलेल्या ठिकाणी ही आग उसळली होती. त्यामुळे सुदैवाने कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा साठा आणि उत्पादन केंद्र सुरक्षित आहे. तसेच या आगीच्या घटनेचा कोरोना लसीच्या पुरवठ्यावर देखील कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सिरम इन्स्टिटयूटला भेट दिली. यावेळी त्यांनी घटना स्थळाची पूर्णपणे पाहणी करत सिरमचे सायरस पुनावाला व अदर पूनावाला यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार चेतन तुपे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित आदी होते.
ठाकरे म्हणाले, सिरममध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरु आहे. ज्या इमारतीमध्ये आग लागली, त्यातील खालचे दोन मजले सुरू होते आणि वरील मजल्यांवर काम सुरू होते. मात्र वरच्या मजल्यांवर नेमकी आग कशाने लागली यासाठी अहवालाची वाट बघावी लागेल. या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच अपघात होता की घातपात याबाबत निष्कर्ष काढणे योग्य ठरणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेत ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांची जबाबदारी कंपनीने घेतली आहे. तरीदेखील काही आवश्यकता असल्यास सरकारही त्यासंबंधी पुढाकार घेणार आहे.
सिरमचे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान
चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर लागलेल्या या आगीत एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली. रोटा लसीचे उत्पादन या नव्या इमारतीत होणार होते. मात्र तरीही या लसीच्या वितारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या इमारतीचा आणि कोविशिल्ड लसीचा कोणताही संबंध नसून त्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
पुण्यातील मांजरी येथील सिरमच्या एसईझेडमधील इमारतीवरील चौथ्या व पाचव्या मजल्यावर गुरुवारी दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. या आगीमध्ये इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे. अडीच वाजता लागलेली आग सुमारे साडेपाच वाजता विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. मात्र त्यात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काल लागलेल्या आगीमुळे पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे, तसेच मोठी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.