गाय महत्त्वाची वाटते मग महिला का नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 02:14 PM2019-12-17T14:14:13+5:302019-12-17T14:15:36+5:30
‘सेंट मीराज’च्या विद्यार्थिनींकडून सवाल
युगंधर ताजणे-
पुणे : एकीकडे गायीला वाचविण्याकरिता देशपातळीवर आंदोलने छेडली जातात. दुसऱ्या बाजूला हैदराबाद येथील घटनेनंतर अद्याप समाजात महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना, ज्या पद्धतीने गाई वाचविण्याकरिता विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्याप्रमाणे महिलांच्या सुरक्षेकरिता का नाहीत, असा सवाल सेंट मीराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजात महिलेच्या सुरक्षेबाबत उपस्थित होणारे प्रश्न आणि त्यावर करावी लागणारी उपाययोजना यावर स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराचे खटले फास्ट कोर्टमध्ये चालविण्यात यावेत. प्रशासनाने आपल्या कामाच्या माध्यमातून ‘‘झीरो टॉलरन्स’’ पॉलिसी राबविण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दहा डिसेंबरपासून विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. याकरिता ते हॉस्पिटल, झोपडपट्टी, विविध महाविद्यालयांत गेले. तेथील व्यक्ती, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांनी आपली भूमिका समजावून सांगितली. देशात सध्या महिलांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्याविरोधात देशातील वातावरण गंभीर झाले आहे. महिलांवर दररोज होणारे अन्याय व अत्याचाराच्या घटनांनी मन विषण्ण झाले आहे. दर तासाला कित्येक महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. यांच्या मनात अद्याप भीतीचे वातावरण आहे. ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था आहे, अशा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यांना हे हल्ले रोखण्यात अपयश येत आहे. आदरणीय पंतप्रधान यांनी या बाबींचा गंभीरपणे विचार करून प्रशासनापुढे निर्माण झालेला हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. अशा आशयाचे पत्र तयार करून त्यावर सेंट मीराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नागरिकांच्या स्वाक्षरी घेत आहेत. दोषींवर तत्काळ कारवाई करणे, त्यांच्या मनात कायद्याचा धाक
निर्माण होणे आणि भविष्यात नागरिकांमध्ये कायदाविषयक आदर राहावा. अशा प्रकारची विद्यार्थ्यांनी पत्रकातून केली आहे.
केवळ स्वाक्षऱ्याच नव्हे, तर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम आम्ही विद्यार्थ्यांनी केले आहे. तुमच्या घरात तुमच्या परवानगीशिवाय कुणी येऊ शकत नाही. तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या शरीराला कुणीही स्पर्श करू शकत नाही. हा मुद्दा घेऊन महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समाजासमोर स्वाक्षरी उपक्रमातून मांडला आहे. आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षºया घेतल्या असून त्याबाबतचे निवेदन पुणे पोलीस आणि पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविणार असल्याची माहिती पूजा सिंग या विद्यार्थिनीने दिले.
............
सुरक्षित भारत संकल्पना समोर...
सुरक्षित भारत अशी संकल्पना डोळ््यांसमोर आम्ही स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ज्या पद्धतीने आपण गाईला माता संबोधतो आणि तिच्या रक्षणाकरिता धाव घेतो. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी एक सुजाण नागरिक म्हणून नजरेआड करता येणार नाही. आज समाजात आपल्या माता, भगिनी, मुली सुरक्षित आहेत का? याविषयी प्रत्येक पालकाच्या मनात काय भावना आहेत? हे समजून घेण्याची गरज आहे. इतर दैनंदिन प्रश्नाविषयी जसे जागरुक राहून आंदोलने करण्यात आपण पुढाकार घेतो, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरण्यात अग्रेसर का राहू नये? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. - जी. एच. गिडवानी, प्राचार्य, सेंट मीराज महाविद्यालय, पुणे.
.........