पोटाची खळगी भरण्यासाठी खान्देशातील महिला विहीर खोदून चालवितात क्रेन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 02:40 PM2018-05-28T14:40:13+5:302018-05-28T14:40:13+5:30
खान्देशातील कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी विहीर खोदण्याचे काम करीत असून चक्क महिला क्रेन चालवीत आहेत.
- हनुमंत देवकर
चाकण : खान्देशातील कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी विहीर खोदण्याचे काम करीत असून चक्क महिला क्रेन चालवीत आहेत. यालाच म्हणतात.... कष्टाची भाकरी....विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात आलेली आहेत. अनेक तरुणांनी चाकण औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकऱ्याही मिळविल्या आहेत. तर अनेक कुटुंबे कष्टाचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
कडाचीवाडी येथील माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांच्या विहीर खोदाईचे काम चालू असून, या कामासाठी जळगाव जिल्ह्यातील जाधव व झाकणे ही दोन कुटुंबं आपल्या मुलाबाळांसह शेतात तंबू टाकून राहून भर उन्हामध्ये हे कष्टाचे काम करीत आहेत. या कुटुंबातील महिला अक्षरश: उरा पोटावर दगड उचलून क्रेनमध्ये भरतात व महिलाच क्रेन चालवित आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या महिला हे कष्टाचे काम करीत असल्याने ते पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करीत आहेत.
१९७२ च्या दुष्काळात चाकण व परिसरातील गावातील लोक अशाच प्रकारची कामे करीत होती. त्या काळात खेड तालुक्यात सर्वाधिक विहिरी खोदणे व पाझर तलाव खोदण्याची कामे झाली. कोयना प्रकल्पाच्या विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाले. नागरिकांनी गावोगावी श्रमदानातून शाळा, बंधारे बांधले. पण औद्योगिकीकरणामुळे चाकणचा झपाट्याने विकास झाला आणि येथील शेतकरी सुखावला. त्यांना रोजगार मिळाला अन् कष्टाची कामे कमी झाली. अन्यथा खेड तालुक्याची परिस्थिती जैसे थे पाहायला मिळाली असती असेच म्हणावे लागेल.