खोरचे आरोग्य उपकेंद्र पडले आहे धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:13+5:302021-04-12T04:09:13+5:30
खोर : दौंड तालुक्यात कोरोनाच्या रोगाने मोठे थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडण्यास सुरुवात झाली आहे. ...
खोर : दौंड तालुक्यात कोरोनाच्या रोगाने मोठे थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य अधिकारी व प्रशासन विभागाचा भोंगळ कारभार सध्या पाहावयास मिळत आहे. यांच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांचे व रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. दौंड तालुक्यात जवळपास अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आली आहेत. परंतु याचा काहीही उपयोग होत नसल्याचे सध्याच्या स्थितीत चित्र पाहावयास मिळत आहे. आज खोर येथील जवळपास १ कोटी १३ लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असाव्यात ह्या हेतूने सुसज्ज असे भव्य उपकेंद्र उभे केले आहे. मात्र, हेच आरोग्य उपकेंद्र आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चक्क धूळखात पडले आहे. याबाबत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा दौंड आरोग्य अधिकारी वर्ग या बाबतीती लक्ष देण्यासाठी तयार होत नाही.. आज हे उपकेंद्र ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे अशी या ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे ना कोणी प्रशासन विभाग ना कोणी आरोग्य अधिकारी व ना कोणी जिल्हा परिषद विभाग लक्ष देण्यास तयार नाही..
या प्रशासन विभागाच्या दिरंगाईमुळे आज कोरोनाच्या रुग्णांची मोठी हेळसांड होत असून अनेक रुग्ण उपचाराअभावी हतबल होऊन बसले आहेत.
फोटोओळ : एकीकडे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे खोर (ता.दौड) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धूळखात पडले आहे. (छायाचित्र : रामदास डोंबे)