लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता हरीश महादू कानसकर याने साथीदारांसह एकाचे अपहरण करून विवस्त्र करत डांबून ठेवून त्याला मारहाण केल्याची घटना घडली. यासोबत त्याच्याकडून खंडणी वसूल केली आहे. मंचर पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बाळासाहेब बारवे (रा. चास) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. हरीश महादू कानसकर, नवनाथ बन्सी थोरात, सागर संतोष वाघ (तिघेही रा. रांजनी ता.आंबेगाव), मनीष हरीश हांडे (रा. पुणे) प्रीतम हनुमान भालेराव (रा.कळंब ता.आंबेगाव), गणेश ऊर्फ बंटी एलभर (रा. अवसरी ता. आंबेगाव), सिद्धेश वायकर (रा. मंचर ता. आंबेगाव) या सात जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता मंचर बस स्थानकाच्या आवारात बारवे यांना वरील आरोपींनी आवाज देऊन बोलावून घेतले. तू मंचर परिसरात माहिती अधिकाराचा अर्ज करतो. मंचरमध्ये आम्ही सर्व असताना तू इथे नाक का खुपसतो. तुला जे काय करायचे ते घोडेगाव, चासला कर. इथं परत माहिती अधिकाराचा अर्ज आम्हाला न विचारता केला तर तुला माहीत आम्ही काय करू शकतो, असे म्हणत धमकावले. तसेच खिशातून पिवळे रंगाचे विशेष पोलीस अधिकारी लिहिलेले हरीश कानास्कर यांचा फोटो असलेले ओळखपत्र दाखविले. यानंतर बारवे यांना दमदाटी करून बाजूला उभ्या असलेल्या गाडीमध्ये मनीष हरीश मिलानी व हरीश कानसकर यांनी जबरदस्तीने बसवले. या वेळी नवनाथ थोरात याने तोंड दोन्ही हाताने घट्ट दाबून ठेवले. हरीश कानसकर यांच्या घरामध्ये बारवे यांना नेले. तेथे सागर वाघ, गणेश येलभर, सिद्धेश वायकर व प्रीतम भालेराव यांनी फिर्यादीस मंचरमध्ये पुन्हा अर्ज भानगडी करणार नाही. यासाठी बारवे यांचे कपडे काढून मारहाण केली. नवनाथ थोरात व हरीश कानसकर याने मोबाईलमध्ये बारवे यांचे विवस्त्र असलेले छायाचित्र तसेच व्हिडिओ काढला. तसेच सर्वाची माफी मागायला लावली. हा प्रकार कोणाला सांगितला तर फोटो आणि व्हिडीओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सोडून दिले. तसेच यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रात्री नऊ ते दहाच्या सुमारास हरीश कानसकर, नवनाथ बन्सी थोरात, सागर वाघ यांनी बारवे यांच्या घरात प्रवेश करत दोन लाख रुपये न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. बारवे यांच्याकडून १० हजार घेत उरलेले पैसे देण्याची मागणी करत निघून गेले. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा बारवे यांना मंचर बस स्थानकावरून उचलून जंगलात नेत त्यांना मारहाण केली. आणि उर्वरित रकमेची मागणी करत तेथे सोडून निघून गेले. या त्रासाला कंटाळून बारवे यांनी मंचर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.