रवींद्र बऱ्हाटेवर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:11+5:302021-04-28T04:10:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे धनकवडी येथील एकता संस्थेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे धनकवडी येथील एकता संस्थेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्या रवींद्र बर्हाटेसह पाच जणांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता असणाऱ्या रवींद्र बऱ्हाटे याच्याविरुद्ध फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्याची मालमत्ताही शासनाने जप्त केली आहे.
युवराज सुरेश कोतवाल (रा. लक्ष्मी रोड), विजय मांगिलाल नागोरी (वय ५५, रा. पोर्णिमा सोसायटी, शंकरशेठ रोड), सुबोध त्रिलोकचंद ओसवाल (वय ४४, रा. श्रीसिद्धाचल सोसायटी, गुलटेकडी) आणि मॅक ड्रॉप (इंडिया) लि़. शनिवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चेअरमन राजेंद्र साठे (वय ६५, रा. सारंग सोसायटी, सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. धनकवडी येथील सर्व्हे नं. १० येथील १ हेक्टर ०१ आर ही जमीन संस्थेच्या नावावर असून उच्च न्यायालयानेही साठे हे चेअरमन असल्याचा निकाल दिला आहे. असे असताना एकता सहकारी गृहरचना संस्थेचे शिक्के, लेटरहेड व प्रोसिडिंग बुक यांसारखे दस्तऐवज बनावट तयार करून संस्थेची सभा झाल्याचे भासवून प्रोसिडिंग बुकमध्ये तशा नोंदी करून सर्व दस्तऐवज धनकवडी गावकामगार तलाठी यांना सादर केली. त्यात रवींद्र बर्हाटे हा संस्थेचा सेक्रटरी व सुधाकर खवले हा चेअरमन असल्याचे तलाठी यांना खोटे भासविले. त्याद्वारे ७/१२ उतार्यावर स्वत:ची नावे लावून संस्थेची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. सुबोध ओसवाल आणि मॅक ड्रॉप हे संस्थेचे सभासद नसताना संस्थेचे बनावट लेटरहेड व शिक्का बनवून घेऊन त्याचा गैरवापर केला. विजय नागोरी व सुबोध ओसवाल हे चेअरमन व सेक्रेटरी असल्याचे भासवून संस्थेची व सभासदांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.