पुणे : रोझरी स्कूलचे संचालक विवेक अरान्हा यांच्या पत्नी आरोपी दीप्ती अरान्हा यांच्याविरोधात शुक्रवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व बनावट कागदपत्रे बनविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती.राजेंद्र जयंत चव्हाण (रा. कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली होती. चव्हाण हे पीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लि. या फायनान्स कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. दीप्ती अरान्हा यांनी २५ जुलै २०१४ रोजी या कंपनीकडून ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्या पैशांमधून मर्सिडीज ही आलिशान गाडी विकत घेतली. कर्जाच्या ४५ लाख रुपयांपैकी २० लाख ३१ हजार ३०३ रुपये अरान्हा यांनी फेडले; मात्र उर्वरित कर्ज न फेडता अरान्हा यांनी गाडी विकायला काढली. कर्ज काढून गाडी घेतल्याने गाडीच्या कागदपत्रांवर बोजा होता. त्यामुळे गाडी विकता येणे शक्य नव्हते. त्यामुळे अरान्हा यांनी कंपनीचे खोटे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तयार केले आणि त्यावर बनावट सही व शिक्के मारले. हे बनावट प्रमाणपत्र त्यांनी आरटीओकडे ११ एप्रिल २०१६ रोजी सादर केले व आरटीओकडून बोजा उतरवून घेतला. दरम्यान, अरान्हा यांनी गाडी विकण्यास काढल्याची माहिती फायनान्स कंपनीला कळाली. गाडीच्या कागदपत्रांवर बोजा असताना गाडी कशी काय विकली जाऊ शकते, याची विचारणा कंपनीने आरटीओकडे केली. यामध्ये अरान्हा यांनी कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे दिसून आले.
‘रोझरी’च्या संचालकांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: May 07, 2016 5:24 AM