पुणे : माजी सैनिकांच्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना भूमि अभिलेखा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी करुन दिली तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी त्यावर मंत्रा २९ गोल्ड कास्ट या प्रकल्पाचा प्लॅन पास करुन दिल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बांधकाम व्यवसायिकासह महापालिका अधिकारी व भूमि अभिलेखा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय.
या प्रकरणी माजी सैनिक राजेंद्रसिंग यांचे कुलमुख्यत्यारधारक विशाल सत्यवान खंडागळे (वय ३५, रा. रामवाडी, नगर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहीत घनश्याम गुप्ता (वय ६०), मुकेश घनश्याम गुप्ता (वय ५५), किशोर पोपटलाल गाडा (वय ४५), निलेश पोपटलाल गाडा (वय ४०, सर्व रा. मेट्रोपोल, बंडगार्डन रोड) तसेच पुणे महानगर पालिका व भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट २००९ ते ४ मे २०२१ दरम्यान घडला आहे. खंडागळे यांनी खडकी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करुन त्याच्या चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी गन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलमुख्यत्यारधारक खंडागळे यांची धानोरी येथील मुंजाबा वस्तीमधील वहिवाटीची सर्व्हे नं २९ मधील एकूण क्षेत्र १५ हजार १०० स्क्वेअर मीटर पैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र, ९ आर (गुंठे) या जागेची मंत्रा २९ गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपी चे भागीदार गुप्ता व इतरांनी येरवडा येथील भुमी अभिलेख कार्यालयात खोटी माहिती देऊन सर्व्हे नं. २९ ची मोजणी करुन घेतली.
या मिळकतीवर सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असतानाही पुणे महानगर पालिका व भुमी अभिलेख अधीक्षक कार्यालय, हवेली येथील अधिकार्याशी संगनमत करुन मंत्रा २९ गोल्ड कोस्ट हा प्रकल्प मंजूर करुन घेतला. फिर्यादी यांची सर्व्हे नं. २९ मधील १५ हजार ९०० स्क्वेअर मीटरपैकी प्लॉट नं. १६, २० आणि २१ क्षेत्र ९ आर (गुंठे) धानोरी येथील जागा त्यांची आहे, असे भासवून ती बळकावून फसवणूक केली असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत