पुणे : ‘गुंडांना काठी तर गँगस्टारांना गोळी’ अशी घोषणा कधी काळी पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले व नंतर केंद्रीय मंत्री झालेल्यांनी पुण्यात असताना केली होती़. आता पत्ते खेळत असताना त्याला अडकाव करणाऱ्या पोलिसांना हे गुंड गोळ्या घालण्याची भाषा करुन लागले आहेत़. या प्रकरणी येरवडापोलिसांनी किरण नंदकुमार साळवे (वय ३२, रा़ महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस नाईक विशाल विठ्ठल गव्हाणे यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना येरवडा पर्णकुटी येथील मुळा मुठा नदीपात्रात शंकर मंदिराच्या मागे रविवारी साडेपाच वाजता घडली. डॉ़. सत्यपालसिंह हे दहा वर्षापूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त असताना गुंडांना काठी तर गँगस्टरांना गोळी अशी घोषणा केली होती़. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, यासाठी अशी घोषणा केली होती़. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर टिका झाल्यानंतरही ते नेहमीच पोलिसांच्या बाजूने उभे रहात होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवड्यातील नदीपात्रात चिमा गार्डनच्या मागील बाजूला रविवारी सायंकाळी काही जण पत्ते खेळत बसले होते. पर्णकुटी बीट मार्शल विशाल गव्हाणे हे गस्त घालत तेथे गेले. त्यावेळी त्यांनी खेळत बसलेल्यांना पत्ते न खेळण्यास सांगितले. त्याबरोबर इतर तेथून पळून गेले. किरण साळवे हा दारुच्या नशेत होता़ पत्ते न खेळण्यास व त्याच्याबरोबरचे साथीदार पळून गेल्याने रागात येऊन पोलिसांना शिवीगाळ केली़, त्यांच्या अंगावर दगडफेक केली़. त्यात विशाल गव्हाणे यांच्या हाताला दगड लागून ते जखमी झाले़. साळवे याने गोळ्या घालून मारणेची धमकी दिली.येरवडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोल्लुरे यांनी सांगितले की, किरण साळवे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्याच्याबरोबर पत्ते खेळणारे पळून गेले. त्याने दगडफेक करुन जखमी केले व धमकी दिल्याने त्याला अटक केली आहे