पुणे : मंगळवार पेठेतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने अटक केली.
याप्रकरणी निखिल दत्ता थोरात (वय २४, रा. वाघोली), रवी ज्ञानेश्वर बोत्रे (वय २४, रा. कोथरुड), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (वय २२), अविनाश राजेंद्र कांबळे (वय २२) आणि राहुल म्हसू शिंदे (वय २४, रा. लोणी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ कोयते, ५ मोबाईल, २ दुचाकी असा माल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींविरुद्ध चतु:श्रृंगी १, चंदननगर २, भारती विद्यापीठ २, कोथरुड ४, उत्तमनगर, हिंजवडी, परांडा येथे प्रत्येकी १ घरफोडी, जबरी चोरी, चोरी, दुखापत असे गुन्हे दाखल आहे. निखिल थोरात व किरण बोत्रे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात २०१९ पासून फरारी असल्याचे तपासात निष्पन्न आहे.
गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना दरोडा टाकण्यासाठी काही जण एकत्र आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक मंगळवार पेठेतील प्लॅटीनम बिल्डिंग येथे पोहचले. तेथे उभ्या असलेल्या वॉटर टँकरच्या बाजूला थांबलेल्या पाच जणांना पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी फरासखाना २, लोणीकंद २ आणि हिजंवडी येथील १ अशा ५ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४ एलसीडी टिव्ही, ४ लॅपटॉप, २ इस्त्री, बुट व रोकड असा ४ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, शशिकांत दरेकर, प्रशांत गायकवाड, तुषत्तर माळवदकर, महेश बामगुडे, सतिश भालेकर, अशोक माने, योगेश जगताप, सचिन जाधव, दत्ता सोनावणे यांनी केली