पुणे : सीमेवर तैनात राहून अहोरात्र देशासाठी झटणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सायकल वापराचे महत्त्व, आरोग्याला होणारा फायदा या गोष्टी तरूणांना पटवून देण्यासाठी पुण्यातील दहा तरूणांची मराठा वॉरियर्स टीम पुणे ते वाघा बॉर्डर अशा सायकल मोहिमेवर रवाना झाली. दिल्लीत या तरुणांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.खासदार छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जल्लोषात त्यांनी मोहिमेला झेंडा दाखवला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेविका विनया तापकीर, पुणे मनपा सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शेकापचे नेते प्रविण गायकवाड, राजाभाऊ गोलांडे तसेच सायकलप्रेमी नागरिक उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले, ‘वाघा बॉर्डरला पोहोचल्यावर मराठा इन्फंट्रीतर्फेया वॉरियर्सचा यथोचित सन्मान होईल, अशी व्यवस्था झाली आहे. तसेच दिल्लीतही त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.’ हे मराठा वॉरियर्स महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा चार राज्यातून तब्बल अठरा दिवसांचा दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून वाघा बॉर्डर गाठणार आहेत.सलग अठरा दिवस अथकपणे हा प्रवास करण्यात येणार आहे. या मार्गावर ज्या ज्या शाळा महाविद्यालये आढळतील, त्या सर्व शाळा महाविद्यालयाला भेटी देऊन तरुणांना भारतीय सेनेमध्ये असणारी संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सायकल चालविण्याचे फायदे व चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यापूर्वी या टीममधील अनेक सदस्यांनी विविध साहसी प्रकार व मोहिमा केल्या आहेत. परंतु, सायकल मोहीम करण्याचे सर्वांची पहिलीच वेळ आहे. सायकल वारी करणाऱ्या मराठा वॉरियर्सच्या संघात राम फुगे, निलेश धावडे, प्रज्ञेश मोळक, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे, विश्वास काशिद व ८ वर्षीय अंशुमन धावडे असे सदस्य आहेत.
२ हजार किलोमीटरच्या सायकल प्रवासाने गाठणार वाघा बॉर्डर; संभाजीराजेंनी दाखवला हिरवा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:30 PM
पुण्यातील दहा तरूणांची मराठा वॉरियर्स टीम पुणे ते वाघा बॉर्डर अशा सायकल मोहिमेवर रवाना झाली. दिल्लीत या तरुणांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देदहा तरूणांची मराठा वॉरियर्स टीम पुणे ते वाघा बॉर्डर अशा सायकल मोहिमेवर रवानाखासदार छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोहिमेस सुरुवातवाघा बॉर्डरला पोहोचल्यावर मराठा इन्फंट्रीतर्फेया वॉरियर्सचा होईल यथोचित सन्मान