चारित्र्य पडताळणीसाठी गर्दी
By admin | Published: January 25, 2017 02:30 AM2017-01-25T02:30:43+5:302017-01-25T02:30:43+5:30
निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आपल्यावर गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती उमेदवारी अर्जात भरायची असल्याने इच्छुकांनी
पुणे : निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आपल्यावर गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती उमेदवारी अर्जात भरायची असल्याने इच्छुकांनी तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाबरोबरच चारित्र्य पडताळणीसाठीचा अर्ज करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली आहे़ त्यामुळे सोमवारी एकाच दिवसात अडीचशे इच्छुकांचे अर्ज विशेष शाखेत जमा झाले आहे़
शहर पोलीस दलाकडून संबंधित व्यक्तीवर त्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल आहे की नाही, याचे रेकॉर्ड तपासून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते़ सरकारी नोकरी, बँका, खासगी संस्थांमधील नोकरी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षा बॅच मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची गरज असते़ विशेष शाखेकडे चारित्र्य पडताळणीसाठी २०१६ मध्ये ५४ हजार अर्ज आले होते़ दर महिन्याला साधारण साडेचार हजार अर्ज येत असतात़
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे़ सोमवारी एकाच दिवशी अडीचशे जणांनी निवडणुकीसाठी चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला आहे़
नेहमी येणाऱ्या अर्जांच्या दुप्पट अर्ज गेल्या दोन दिवसांपासून येण्यास सुरुवात झाली आहे़
निवडणुकीसाठी चारित्र्य पडताळणी करून देण्यासाठी मर्यादित वेळ असल्याने विशेष शाखेच्या वतीने जास्तीत जास्त लवकर असे प्रमाणपत्र देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे़ त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे़ विशेष शाखेत अर्ज आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे रवाना होतो़ तेथील चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा विशेष शाखेकडे रवाना केला जातो़ तेथे सर्व शहरांतील गुन्ह्यांच्या नोंदीबाबत संगणकीय तपासणी करून त्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र दिले जाते़ त्यात अनेकदा नावात साम्य असू शकते़ प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्याची खात्री केली जाते़