पुणे : मान्सूनने शहरात हजेरी लावल्याने तसेच रविवार असल्याने पर्यटकांनी खडकवासला धरणावर गर्दी केली हाेती. खडकवासला धरण पर्यटकांचे नेहमीच आवडीचे ठिकाण राहिले आहे. मान्सून सुरु असल्याने आणि त्यातच रविवार असल्याने नेहमीपेक्षा जास्त गर्दी खडकवासला धरणावर झाली हाेती. त्यामुळे चाैपाटी मार्गावर वाहतूक काेंडी हाेऊन वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.
जून महिना काेरडा गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. गुरुवार, शुक्रवार या दाेन दिवसात शहरात माेठ्याप्रमाणावर पाऊस झाला. त्याचबराेबर पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांमध्ये देखील पाऊसाने हजेरी लावली. मान्सून सुरु झाला की खडकवासला धरणावर नागरिकांची गर्दी हाेत असते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने माेठी गर्दी धरणावर झाली हाेती. पर्यटकांनी मनसाेक्त वर्षाविहाराचा आनंद लुटला. यात तरुणांची संख्या लक्षणीय हाेती. त्याचबराेबर सिंहगड, पानशेत या ठिकाणी देखील नागरिकांनी माेठ्याप्रमाणावर गर्दी केली हाेती. त्यामुळे खडकवासला धरणाच्या रस्त्यावर वाहतूक काेंडी झाली हाेती.
धरणाच्या पाण्यात उतरण्यास बंदी आहे. परंतु अनेक तरुण पाण्यात उतरुन धाेकादायकरित्या सेल्फी घेत हाेते. त्याचबराेबर अनेक तरुण या पाण्यात पाेहत हाेते. प्रशासनाकडून त्यांच्यावर कुठलिही कारवाई करण्यात येत नव्हती. खडकवासला चाैपाटीवर हाेणारी गर्दी लक्षात घेता हवेली पाेलिसांकडून उपायययाेजन करण्यात आल्या आहेत. पुण्याकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला बांबूचे बॅरिकेटींग करुन वाहन लावण्यास बंदी घालण्यात आली हाेती. त्याचबराेबर चाैपाटीवर असणारे स्टाॅल्स देखील या बॅरेकेटच्या आत ठेवण्यात आले हाेते. त्यामुळे रस्त्यावर नागरिक येत नव्हते. पुण्याकडून खडकवासल्याकडे येणाऱ्या रस्त्यावर मात्र माेठ्याप्रमाणावर वाहने लावण्यात आली हाेती. संध्याकाळच्या वेळी वाहनांच्या रांगा या भागात लागलेल्या दिसून आल्या.