कोरेगाव भीमा : भीमा नदिकाठावरील ऐतिहासीक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोटणारा भीमसागर यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिकात्मक साजरा करण्यात आला असल्याने व पोलीसांनी पासेस योजना राबविल्याने लाखोत असणअरी गर्दी काही हजारात येवूनही भीमसैनिकाच्या उत्साहाने शौर्यदिन दिमाखात साजरा झाला.
एक जानेवारी रोजी शौर्यदिनी मानवंदना देण्यासाठी दरवर्षी देशभरासह राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भीम अनुयायांचा भीमसागर लोटत असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे देशभरासह राज्यातील प्रमुख मोठे सन , उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर १ जानेवारी शौर्यदिनही प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी आठ ते दहा हजारांदरम्यान भीम अनुयायांनी विजयस्तंभास मानवंदना दिली. गर्दि कमी असुनही भीम अनुयायांच्या मुखी ‘जोरसे बोल जयभीम बोल’ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांमुळे आसमांत दणानून गेला होता. यावेळी दि. ३१ व १ जानेवारी मानवंदना कार्यक्रमाचे दुरदर्शन व इतर माध्यमांमधुन लाईव्ह टेलीकास्ट करण्यात आले असल्याने घरी बसुनही लाखो भीम अनुयायांना विजयस्तंभाची मानवंदना अनुभवता आली.