लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : कोरोनाचे निर्बंध झुगारून वर्षाविहारासाठी प्राचीन नाणेघाटात गर्दी केलेल्या पर्यटकांवर जुन्नर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४९ जणांकडून २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पर्यटनस्थळावर बंदी असताना प्रवेश करणे, शारीरिक अंतर न पाळणे, मास्क न लावणे, या कारणांवरून पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शासनाचे निर्देश असेपर्यंत ही कारवाई सातत्याने करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. वर्षाविहारासाठी नाणेघाट व दाऱ्या घाटाकडे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. माळशेज घाटात दरड कोसळण्याची भीती आहे. पर्यटकांचा ओघ सध्या नाणेघाट व दाऱ्या घाटाकडे वाढला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांतून युवक तसेच कुटुंब शनिवार, रविवार सुट्टीच्या औचित्याने सहलीसाठी येत आहेत. अजूनही लॉकडाऊन कायम आहे. पर्यटनस्थळे बंद आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडू नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.