कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सोमवारी झालेल्या दंगलीचे पडसाद राज्यभर उमटत असून, कोरेगाव भीमा दुसºया दिवशीही तणावाखालीच आहे. परिसरात संचारबंदी व जमावबंदी असून, आज सकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांनी दाखविलेला संयम व स्थानिकांचे सहकार्य मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनीही दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देत स्थानिकांना शांततेचे आवाहन केले.दरम्यान, दुसऱ्या दिवशीही कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, लोणी कंद, पेरणे या ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. संचारबंदी असतानाही आज सकाळी एका गटाने गावामध्ये फेरी मारून काही काळ रास्ता रोको केला. त्यामुळे पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी हा जमाव पांगविला. त्यानंतर पुन्हा परिस्थिती नियंत्रणात आली. कोरेगाव भीमा परिसराला पोलीस छावणीचे रूप आले असून, रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू आहे. संचारबंदीत कोणीही रस्त्यावर थांबू नये, अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून दिल्या जात आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी गावामध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले असून, जातीय ताणतणाव निर्माण होऊ नये म्हणून १ जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
...तर मोठा अनर्थ घडला असतापोलिसांनी कालची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असून, बफर झोन तयार करून दोन गटांमधील अंतर कायम ठेवले. पोलिसांवरच दगडफेक होत असताना त्यांनी संयम ठेवून फक्त अश्रुधूर व लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, की ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध लोकांचा यात बळी जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करून योग्य ती मदत मिळवून दिली जाईल.’ या वेळी पत्रकार परिषदेत ‘पूर्वकल्पना असतानाही घटनास्थळी पोलीस बळ कमी पडले का?’ असा सवाल पत्रकारांनी केला असता वढूतील झालेली घटना सामंजस्याने मिटविली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नव्हते. काढण्यात आलेली रॅलीही पूर्वनियोजित नव्हती. रॅली समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होऊन हा तणाव निर्माण झाल्याचे केसरकर यांनी सांगितले.
पंचनाम्यासाठी एसआयटी टीमकोरेगाव भीमा येथील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. पंचनामे केले जातील व भरपाई मिळवून देण्यावर भर दिला जाईल. घटनेवेळीचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देत तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.