सायकल शेअरिंगला चोरीचे ‘ग्रहण’; लॉक तोडण्याचेही प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 01:17 AM2018-10-16T01:17:00+5:302018-10-16T01:17:18+5:30
प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात गेल्या वर्षी सायकल शेअरिंग योजना सुरू झाली. या योजनेला चांगला प्रतिसाद दिल्याने अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे.
- श्रीकिशन काळे
पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात गेल्या वर्षी सायकल शेअरिंग योजना सुरू झाली. या योजनेला चांगला प्रतिसाद दिल्याने अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे. परंतु, काही ठिकाणी सायकलींचे लॉक फोडणे, सायकल चोरणे, सायकल कुठेही टाकून देणे आदी प्रकार होत असल्याने संबंधित कंपनी हैराण झाली आहे. त्यामुळे या योजनेत नव्याने दाखल करण्यासाठी आणलेल्या नवीन ५ हजार सायकली चाकण येथे प्रतीक्षेत आहेत.
स्मार्ट सिटीअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ५ डिसेंबर २०१७ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर शहरातील फर्ग्युसन रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, कोथरूड, विमाननगर, कॅम्प, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, सर्व पेठांमध्ये सायकल योजना सुरू झाली.
महापालिकेच्या वतीने सायकल स्टॅँड आणि ठिकठिकाणी सायकल पार्किंगचे फलक लावण्यात आले. शहरात ओफो, झूमकार पेडल आणि मोबाईक या तीन कंपन्यांनी सायकली दिल्या आहेत. शहरात एकूण २५०० सायकली ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या. परंतु, सध्या त्यातील २ हजारच रस्त्यावर आहेत. सुमारे ५०० सायकलींची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे त्या दुरुस्तीसाठी आणि काही भंगारात टाकून दिल्या आहेत, अशी माहिती मोबाईक सायकल कंपनीचे सिटी आॅपरेशन्स हेड आदर्श केदारी यांनी ‘लोकमत’ला दिली.
वस्ती परिसरात सायकल चोरीचे प्रकार
ज्या भागात वस्ती आहे, त्या ठिकाणच्या सायकली चोरीला जात आहेत. कारण वस्तीमधील लहान मुले सायकली घेऊन जातात आणि दगडाने लॉक तोडतात. असे प्रकार येरवडा, मिठानगर, रामनगर, लोहियानगर (स्वारगेट), दत्तवाडी परिसरात होत आहेत. येरवड्यात तर एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने १२ सायकली स्वत:च्या ताब्यात घेतल्या होत्या. त्या पैसे दिल्याशिवाय देणार नाही, असे म्हणत होता. तेव्हा कंपनीचे लोक पोलिसांना घेऊन गेले आणि सायकली सोडवून आणल्या.
चोरीच्या प्रकारावर पोलीसही हतबल
चोरीला जाऊ नये आणि तोडफोड होऊ नये, यासाठी कंपनीच्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. परंतु, पोलिसांचे म्हणणे आहे की, लहान मुलांना शिक्षा करता येत नाही. त्यामुळे त्यांना धाक राहत नाही. खरं तर त्यांच्या पालकांमध्ये याबाबत जागृती झाली पाहिजे. तरच यावर रोख लागू शकतो.