डी. एस. कुलकर्णींविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 04:31 AM2017-10-29T04:31:08+5:302017-10-29T04:31:18+5:30
गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध अखेर शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध अखेर शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र नारायण मुळेकर (६५, रा़ कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार पोलिसांनी डीएसकेंसह त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़
गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल डी़ एस़ के़ उद्योगसमुहाविरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या़ त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता़ पोलिसांनी डीएसकेंना चौकशीसाठी तीन वेळा बोलविले होते़ प्रत्येक वेळी त्यांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्याने गुंतवणुकदारांनी फिर्याद न देता काही दिवस वाट पाहण्याचे ठरविले होते़ तरीही पैसे परत न केल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी डीएसके ब्रदर्स आणि डीएसके सन्स या कंपनीमध्ये २०१४ पासून एकूण १४ लाख ४० हजार रुपये गुंतविले होते़ त्यापैकी १ लाख ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही मुद्दल व व्याज असे ४ लाख, ४० हजार रुपये परत मिळाले नाहीत. मुळेकर यांच्यासह २२ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या आहेत.