पुणे : बारा तासांची नाेकरी, आंदाेलने, बंदाेबस्त या सगळ्यांमध्ये पाेलिसांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. आई आणि वडील दाेघेही पाेलीस खात्यात असतील तर मुलांच्या संगाेपणाची चिंता त्यांना सतावत असते. तसेच कामाच्या वेळांमुळे त्यांच्या मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष हाेते. यावरच आता पुणे पाेलिसांकडून ताेडगा काढण्यात आला आहे. पाेलिसांच्या मुलांसाठी भातुकली या संस्थेच्या मदतीने डे केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नाेकरीवर असल्यावर आपल्या लहान मुलांचा सांभाळ काेण करणार ही चिंता पाेलिसांची मिटली आहे. पुण्यातील पाेलीस मुख्यालय व साेमवार पेठ येथे ही डे केअर सेंटर सुरु करण्यात आली आहेत.
भातुकली सस्थेच्या मार्फत हे डे केअर सेंटर चालविण्यात येत आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हे डे केअर सेंटर सुरु असते. या डे केअर सेंटरमध्ये अनेक खेळणी ठेवण्यात आली आहेत. त्याचबराेबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक बुद्दीमत्ता वाढविणारे खेळही येथील कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत आहेत. त्याचबराेबर मुलांना आराम करता यावा यासाठी झाेपण्याची साेय देखील याठिकाणी करण्यात आली आहे. मुलांची संपूर्ण काळजी येथील कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. शिवाजीनगर आणि साेमवार पेठ या दाेन ठिकाणी ही डे केअर सेंटर आहेत. पुण्यातील विविध पाेलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पाेलीस कर्मचारी आपल्या मुलांना या डे केअर सेंटरमध्ये सकाळी साेडतात, तसेच कामावरुन घरी जाताने साेबत घेऊन जातात. येथे असणाऱ्या खेळण्यांमुळे तसेच इतर उपक्रमांमुळे मुलेही या डे केअर मध्ये रमत आहेत. 4 महिन्याच्या बाळापासून 10 वर्षांच्या मुलांची साेय या ठिकाणी करण्यात आली आहे.
भातुकली संस्थेच्या संचालिका वैशाली गलांडे म्हणाल्या, पाेलिसांच्या मुलांसाठी हे डे केअर सुरु करण्यात आले आहे. 50 मुलांची याची क्षमता आहे. मुलांसाठी येथे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पाेलिसांच्या कामाच्या वेळा 12 तासांच्या असतात. त्यामुळे पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. त्यामुळे येथे त्यांच्या मुलांचे संगाेपन केले जाते. येथे मुलांच्या चाैफेर आहाराची काळजी घेतली जाते. तसेच मुलांच्या शारीरिक, भावनिक, बाैद्धिक विकासावर आम्ही काम करणार आहाेत. तसेच मुलांसाेबत चांगला वेळ कसा घालवता येईल यासाठी पालकांचे देखील समुपदेशन करण्यात येणार आहे.