दिवाळी खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 02:55 AM2018-10-28T02:55:46+5:302018-10-28T02:56:08+5:30
नागरिकांच्या उत्साहाने वाहतूककोंडीत भर
पुणे : दिवाळी अगदी तोंडावर आलेली असताना शनिवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठून खरेदीसाठी नागरिकांनी सहकुटुंब शहराच्या मध्यवस्तीत
गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे आज सकाळपासूनच लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून येत होते. त्यात आज गणेश चतुर्थी असल्याने दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने आल्याने या वाहतूककोंडीत आणखीच भर पडली.
दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील अल्पना चित्रपटगृहानजीक असलेल्या नागझरी नाल्याच्या परिसरातील पुलाचे काम महापालिकेकडून करण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारपासून या भागातील वाहतूक वळवण्यात आली. लक्ष्मी रस्त्याने जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आल्याने बस संत कबीर चौकातून पॉवर हाऊस चौकातून दारूवाला पूलमार्गे वळून पुन्हा लक्ष्मी रोडवर आल्या. त्यामुळे फडके हौद, गणेश रोड ते जिजामाता चौक दरम्यान सायंकाळनंतर मोठी कोंडी झाली.
सायंकाळनंतर लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, टिळक रोड भागातील वाहतूक विस्कळीत झाली. मंडई परिसरातील वाहनतळावर वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने दुपारनंतर वाहनतळ बंद ठेवण्यात आला होता. कपडे खरेदीसाठी नागरिकांनी लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड भागात गर्दी केल्याने रात्री उशिरापर्यंत या भागातील दुकाने खुली होती.
नियोजन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ
दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहराच्या मध्य भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे. अल्पना चित्रपटगृह परिसरात नाल्यावरील पुलाचे काम करण्यात येत आहे.
दिवाळी खरेदीसाठी गर्दी, पुलाच्या कामामुळे शनिवारी या भागातील वाहतूक विस्कळीत झाली़ खरेदीसाठी आलेले नागरिक व गणेश दर्शनासाठी आलेले भाविक यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतूककोंडी झाल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.