रामोशीवाडी परिसरात मृत बिबट्या, नागरिकात दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:35 AM2018-11-15T01:35:09+5:302018-11-15T01:35:31+5:30
नागरिकांत दहशत : शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळणार
लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रामोशीवाडी येथील डोंगरात एक अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या मृतावस्थेत मिळून आला आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, हे समजले नसून उत्तरीय तपासणीनंतर खरे कारण समजणार असल्याची माहिती शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
रामोशीवाडी येथील राहुल काळे हा तरुण सकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे ऐतिहासिक मल्हारगडाच्या पायथ्याला असलेल्या मालदरा परिसरात आपले बैल चरण्यासाठी घेऊन चालला होता. त्याला शिवाजी गोविंद वाल्हेकर यांचे गट क्रमांक ९५७ या क्षेत्रातील झुडपात अचानक बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने तो घाबरला व जिवाच्या आकांताने सुमारे दोन किलोमीटर पळत परत रामोशीवाडी येथे आला. ही बाब त्याने आपला मित्र पारस वाल्हेकर यास सांगितली. यानंतर त्यांच्यासमवेत ८ ते १० तरुण मालदरा परिसरात गेले. त्यांनी घाबरून लांबूनच त्याला खडे मारले. परंतु, काहीच हालचाल होत नाही, हे पाहून ते सर्व जण भीत भीत जवळ गेले. त्यावेळी त्यांना तो बिबट्या असल्याचे लक्षात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी तत्काळ वनखात्याशी संपर्क साधला व घटना कळवली. वनखात्याचे उपवनसंरक्षक अधिकारी श्रीलक्ष्मी, सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपाल वाय. यू. जाधव, एस. एस. सपकाळ, आर. बी. रासकर, बी. एस. वायकर, जागृती सातारकर, वनमजूर नाना भोंडवे हे या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच. डी. शिंदे व पी. एल. गाडे यांनी तपासणी केली. बिबट्या हा नरजातीचा असून पूर्ण वाढ झालेला आहे. याची लांबी २ मीटर असल्याचे, तसेच याचा मृत्यू सुमारे १० ते १२ तासांपूर्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले
बिबट्याच्या अंगावर बाहेरील बाजूस कसल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. परंतु, याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समजणार आहे, असे सांगितले. त्यानंतर बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याचा मृतदेह औंध पुणे येथील पशुचिकित्सालयात पाठवण्यात आला आहे.