कर्णबधिर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्यादिवशी सुद्धा सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:17 PM2019-02-26T14:17:58+5:302019-02-26T14:19:46+5:30
समाजकल्याण कार्यालयावर ठिय्या मांडलेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असून अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.
पुणे : समाजकल्याण कार्यालयावर ठिय्या मांडलेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असून अद्याप कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सध्या कांबळे यांची समाजकल्याण आयुक्तांसोबत बैठक सुरु असून त्यातून काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांकेतिक भाषेत आम्हाला शिक्षण मिळावं, नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या मागणी साठी समाजकल्याण कार्यालयावर कर्णबधिर विद्यार्थी सोमवारी मोर्चा घेऊन आले होते. यावेळी पोलिसांशी झालेल्या गैरसमाजातून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यात काही विद्यार्थी जखमी झाले होते. या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालायसमोरच कालपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला होता.
दरम्यान जोपर्यंत अधिवेशनात कुठली घोषणा होत नाही तोपर्यंत दिलीप कांबळे या विद्यार्थ्यांना कुठलेही आश्वासन देणार नाहीत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.