पुणे जिल्ह्यातील रावडे गावात २५ मोर, लांडोर; रानकोंबड्यांचा मृत्यू, वनविभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:08 PM2018-01-24T18:08:09+5:302018-01-24T18:12:08+5:30
रावडे (ता. मुळशी) गावाच्या हुलावळेवाडी येथील रिव्हरडेल कॉलेज व घावरेबाबांच्या डोंगरादरम्यान मळ्यामध्ये सुमारे २५पेक्षा जास्त मोर, लांडोर तसेच रानकोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या डोंगरावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
भूगाव : रावडे (ता. मुळशी) गावाच्या हुलावळेवाडी येथील रिव्हरडेल कॉलेज व घावरेबाबांच्या डोंगरादरम्यान मळ्यामध्ये सुमारे २५पेक्षा जास्त मोर, लांडोर तसेच रानकोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या डोंगरावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
या ठिकाणी ‘लोकमत’ने पाहणी केली असता गावातील शेवटच्या शेतापासून वरच्या बाजूस असलेल्या वनविभागाच्या जागेत २५ ते ३० वेगवेगळ्या ठिकाणी मोर, लांडोर, रानकोंबड्या तसेच इतर पक्ष्यांची पिसे आढळली. एक मोर व रानकोंबडी मृतावस्थेत आढळून आली.
या परिसरात सुमारे १५० मोरांचे वास्तव्य असून, सध्या अन्न व पाण्याच्या शोधात हे मोर लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. शेतकऱ्यांनी शेतात हरभरा, ज्वारी, गहू, मसुर, वाटाना यांसारखी खरीप पिके घेतली आहेत. हे खाण्यासाठी मोर व इतर पक्षी शेतात येतात. मोरांचा मृत्यू कशाने झाला, याबद्दल नेमके कारण कळले नाही, परंतु शेतात टाकल्या जाणाऱ्या विषारी खतामुळे मोर व इतर पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
आठ दिवसांपासून ही घटना घडत असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. याबाबत वनविभागाशी संपर्क होऊ शकला नाही.
येथील एका मोकळ्या शेतात ५ ते ६ मोर, तसेच डोंगरावर २०-२५ मोर मृतावस्थेत आढळून आले होते, गावातील कुत्र्यांनी ते फस्त केले. हे सत्र सात ते आठ दिवसांपासून चालू आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.