पाण्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू ; पुणे जिल्हायातील दाेन वेगवेगळ्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 08:51 PM2019-07-07T20:51:49+5:302019-07-07T20:54:31+5:30
पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या दाेन घटनांमध्ये तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
जेजुरी/ लोणीकाळभोर : जिल्ह्यात दोन वेगवेगळळ्या घटनांमध्ये पाण्यात पडून तिन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पहिल्या घटनेत जेजुरी शहराच्या पूर्वेला असणा-या पेशवे तलावात पोहण्यसाठी गेलेल्या दोन लहान शाळकरी मुले बुडाले. तर दुस-या घटनेत हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे घराच्या समोर खेळतांना पाणीसाठवण्याच्या टाकीत पडल्याने तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
जेजुरी येथे रविवारी सकाळी ११ वाजता आदर्श मनोहर उबाळे, ( वय ७) आणि आदित्य संभाजी कोळी ( वय ९, दोघेही रा. जुनी जेजुरी ता.पुरंदर) हे दोघेजण रविवारी सुट्टी असल्याने पोहायला गेले होते. पावसामुळे तलावातील अनेक खड्यात पाणी साचलेले होते. त्यापैकी एका खड्ड्यात ही दोन्ही मुले पोहत होती. पोहताना मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने ही दोन्ही मुले बुडाली. दुपारपर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता या खड्ड्याचा काठावर त्यांची कपडे आढळून आली. या बाबतची खबर जेजुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांच्या मदतीने पोहणारे तरुणांनी खड्यात उतरून मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या खड्ड्याची खोली १५ फुटांपेक्षा जास्त असल्याने, तसेच पाणी गढूळ असल्याने सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. शव विच्छेदनानंतर मुलांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुर्दैव म्हणजे ही दोन्ही मुले आई वडिलांना एकुलती एक होती. पेशवे तलाव अनेक वर्षांपासून कोरडा राहिल्याने तलावातून मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन होत असल्याने तलावात मोठे खड्डे झालेले आहेत. याच खड्ड्यामुळे यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आतापर्यंत तीन ते चार मुलांचा बळी या खड्डयांनी घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने पुढील तपास करीत आहेत.
दुस-या घटनेत कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कदमवस्ती येथे केतकी जयदेव मगर (वय ३) घरासमोर खेळत होती. खेळतांना घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडल्याने तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि ७) सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या महितीनुसार, जयदेव सुखदेव मगर हे आपली पत्नी व मुलगी केतकी यांचेसह कदमवस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे समर्थ निवास या बंगल्यात राहतात. घराच्या मुख्यदरवाज्यापुढे अवघ्या तीन फूट अंतरावर जमिनीमध्ये पाणी साठवण टाकी आहे. टाकीवरील लोखंडी झाकणाचा पत्रा पुर्णपणे सडला आहे. त्याच्यावर प्लाष्टीकचा कपडा टाकला होता.
रविवारी सकाळी जयदेव मगर हे नेहमीप्रमाणे आपल्या ऑटोमोबाईल दुकानात गेले होते. साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी घरात स्वयंपाक करत होत्या. तर केतकी ही घरासमोर खेळत होती. ती खेळता - खेळता पाण्याच्या टाकीच्या झाकणावर गेली. हे झाकण झिजून सडले असल्याने ती आत साठवलेल्या पाण्यात पडली. त्यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने ही कोणाच्या लक्षात आली नाही. स्वयंपाक झालेनंतर पंधरा मिनिटांनी केतकी गायब असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. तिचा आजूबाजूला शोध घेत असताना अचानक टाकीकडे लक्ष गेले असता त्यांना टाकीवरील झाकण उघडे असल्याचे दिसले. यावर केतकीच्या आईने वेळ न दडवता शेजारी रहात असलेल्या दिपक काळभोर यांना सदर बाब सांगितली. सुमारे सहा फूूट खोल असलेल्या टाकीत ते उतरले. त्यावेळी त्यांना केतकीचा मृतदेह पाण्याच्या टाकीच्या तळाशी आढळून आला. बाहेर काढलेनंंतर तिला तात्काळ लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये नेले तेथील डॉक्टरांनी तपासणी करून ती मयत झाली असल्याचे सांगितले.