पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांत वाद
By admin | Published: February 26, 2017 03:53 AM2017-02-26T03:53:45+5:302017-02-26T03:54:08+5:30
नॅककडून राज्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या
पुणे : नॅककडून राज्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या दोन्ही संघटनांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा स्फोट झाला. परिणामी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन व न्यायालयाची पायरी चढावी लागली. परंतु, वेळीच आवर घातला गेला नाही; तर हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही महिन्यांपासून काही विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जावी, या उद्देशाने विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित आहे. तसेच समाजात मांडल्या जाणाऱ्या विचारांवर कायद्याच्या चौकटीत राहून संघटनांनी लढा द्यावा. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून समाजातील दोन गटांकडून मांडल्या जाणाऱ्या विचारसरणीचा निषेध नोंदवला जात आहे. एखादा अधिकारी संघटनेच्या कामात अडथळा निर्माण करत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी केली जाते. त्यामुळे संघटनेच्या विरोधात बोलण्यास अधिकारी पुढे येत नाहीत. काही दिवसांपूर्वी महापुरुषाच्या जयंतीसाठी एका विद्यार्थी संघटनेने दमबाजी करून विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून हजारो रुपयांची वर्गणी वसूल केली. विद्यापीठ विद्यार्थी संघटनाच चालवत आहेत का? अशी चर्चा विद्यापीठात सुरू झाली आहे. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
शांततेचे आवाहन विद्यापीठ प्रत्येकाच्या विचारांचा
आदर करते. विद्यापीठाचे वातावरण शांत, सलोख्याचे आणि सुसंवादी राहील याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची वेळ विद्यापीठावर आणू नये. विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब न करता कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी केले आहे.