डेक्कन, इंद्रायणी एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:48 PM2018-07-10T15:48:37+5:302018-07-10T15:48:48+5:30
मुंबईत मागील आठवड्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पुणे-मुंबईदरम्यान दररोज एक-दोन गाड्या रद्द कराव्या लागत आहेत.
पुणे : रेल्वे प्रवाशांना मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा दररोज फटका बसत आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी व बुधवारीही डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या दोन्ही बाजूने रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
मुंबईत मागील आठवड्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पुणे-मुंबईदरम्यान दररोज एक-दोन गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेसच्या प्रवाशांना बसत आहे. रेल्वेकडून या दोनच गाड्या सातत्याने रद्द केल्या जात आहेत. मुंबईत पावसाची संततधार कायम असल्याने मंगळवारी (दि. १०) व बुधवारी (दि. ११) डेक्कन व इंद्रायणी एक्सप्रेस तसेच पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दोन्ही दिवस दौंड-मनमाडमार्गे धावेल.
वसई रोड येथे पाणी तुंबल्याने काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पुणे-हजरत निझामुद्दीन दुरोंतो एक्सप्रेस ही गाडी मंगळवारी दौंड-मनमाड-खांडवा-भोपाळ या मार्गावर सोडण्यात आली. तुतीकोरीन-ओखा विवेक एक्सप्रेसला इगतपुरी-मनमाड-जळगाव मार्गावरून तर यशवंतपुर-बारमेर एक्सप्रेसला इगतपुरी-भुसावळ-खांडवा-भोपाळ-रतलाम या मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
-------------