विद्यार्थ्यांना हेल्मेटसक्तीबाबत संस्थात्मक चर्चेनंतर निर्णय
By admin | Published: March 8, 2016 01:33 AM2016-03-08T01:33:36+5:302016-03-08T01:33:36+5:30
विद्यार्थी व शिक्षकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरण्याबाबत महाविद्यालयांनी प्रबोधन करून योग्य कार्यवाही करावी.
पुणे : विद्यार्थी व शिक्षकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरण्याबाबत महाविद्यालयांनी प्रबोधन करून योग्य कार्यवाही करावी. तसेच महाविद्यालयाच्या आवारात विनाहेल्मेट कोणालाही प्रवेश देऊ नये, अशी जबाबदारी प्राचार्यांवर सोपविण्यात आली आहे. हेल्मेट वापराबाबत प्राचार्यांकडून स्वागत केले जात असले; तरी संस्थात्मक पातळीवर चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे पुण्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंंडळाने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना हेल्मेट वापराबाबत परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. हेल्मेट वापराबाबत प्रबोधन व कार्यवाही करण्याची जबाबदारी प्राचार्यांकडे सोपविली आहे. प्राचार्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला असता त्यांनी या निर्णयाचे स्वागतच
केले. मात्र, अंमलबजावणीबाबत संस्थात्मक पातळीवर चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनीही हेल्मेट वापराबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच प्रमाणे एकदमच या निर्णयाची अंमलबजावणी न करता त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
> हेल्मेट वापरण्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे आहे. विद्यापीठ व प्रादेशिक परिवहन विभागाने पाठविलेले परिपत्रक महाविद्यालयाच्या आवारात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. महाविद्यालयाच्या आवारात हेल्मेट वापरण्याबाबत विद्यार्थी व शिक्षकांना आवाहन केले जाईल. मात्र, संस्थास्तरावर याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
-डॉ. रवींद्रसिंह परदेशी,
प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज