पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जात असून, यासंदर्भातील अंतिम अहवाल ऑगस्ट महिनाअखेरीस तयार होणार आहे. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. कोरोनापरिस्थितीत सुधारणा होत असल्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. तसेच, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने व तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांना सर्व कुलगुरू व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील काही विद्यापीठांशी व जिल्हाधिकाऱ्यांशी महाविद्यालये सुरू करण्याबाबत संवाद साधला असून उर्वरित महाविद्यालयांशी चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरी राज्यातील शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग व राज्याच्या टास्क फोर्सच्या मान्यतेची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावरील अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात होणार आहे.
-------------------------------------
महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे कुलगुरू व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला जात आहे. येत्या महिना अखेरीस सर्वांशी चर्चा करून अंतिम अहवाल तयार केला होईल.
- डॉ.धनराज माने, संचालक ,उच्च शिक्षण,महाराष्ट्र राज्य