चौफुला-न्हावरा राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:46+5:302021-02-15T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : चौफुला-केडगाव-न्हावरा राज्यमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : चौफुला-केडगाव-न्हावरा राज्यमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली आहे.
कुल त्यांनी नुकतीच दिल्ली येथे गडकरी यांची यासंदर्भात भेट घेतली.
राष्ट्रीय प्राधिकरणाद्वारे न्हावरा- केडगाव-चौफुला राज्यमार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करण्यात आला. परंतु अद्याप तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेला नाही. हा रस्ता पुणे-मुंबई, पुणे-नाशिक, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे-सातारा आदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यासोबतच या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात यावे. पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथील भुयारी मार्ग तसेच दौंड तालुक्याच्या विविध गावांच्या हद्दीतून जाणाऱ्या अनेक ठिकाणी प्रलंबित असलेल्या सेवा रस्त्यांबाबत आपल्या निवेदनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पुढील कार्यवाहीच्या सूचना याआधी केल्या आहेत. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच तत्काळ कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
चौकट:-
पुणे-सोलापूर महामार्गावरील महत्त्वाच्या गावांमध्ये ओव्हरब्रीज उभारावेत-
पुणे-सोलापूर महामार्ग हा पुण्यालगत दाट लोकवस्ती असलेल्या गावातून जातो. विशेषता शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा, उरुळी कांचन इत्यादी गावांमध्ये मोठी लोकसंख्या आहे व या ठिकाणी महामार्गावरील जंक्शनमध्ये वाहतुकीची कोंडी, गर्दी ज्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होतात. रस्ते सुरक्षेसाठी आणि या ठिकाणी घडणारे अपघात, इजा आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागातील महामार्गावरील मुख्य जंक्शनवर ओव्हरब्रीज उभारण्यात यावेत तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर दाट लोकवस्ती असणारे व अपघातप्रवण क्षेत्र ओळखून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीदेखील आमदार राहुल कुल यांनी गडकरी यांचेकडे केली आहे.
फोटो : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करताना आमदार राहुल कुल.