विमानतळबाधित जागांचा मोबदला जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:30+5:302021-02-15T04:11:30+5:30
भुलेश्वर : पारगाव वगळून विमानतळ नियोजित जागेवरच करा आणि बाधितांना द्यावयाचा मोबदला तत्काळ जाहीर करा. मोबदला पाहून शेतकरी आपला ...
भुलेश्वर : पारगाव वगळून विमानतळ नियोजित जागेवरच करा आणि बाधितांना द्यावयाचा मोबदला तत्काळ जाहीर करा. मोबदला पाहून शेतकरी आपला निर्णय घेतील, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. तसे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
राजुरी, रीसे, पिसे, मावडी, पिंपरी, पांडेश्वर, नायगाव या नवीन गावात विमानतळ केल्यास त्याचा पुरंदरच्या विकासाला फायदा होणार नसल्याने जागा बदलास आपला विरोध असल्याचे शिवतारे यांनी पत्रात म्हंटले आहे.
गायरान जमिनी दोनही ठिकाणी किरकोळ स्वरूपात आहेत. वनजमिनीसुद्धा फार मोठ्या नाहीत. याउलट जुन्या गावांमध्ये सन २००१ पासून आजपर्यंत जवळपास ३५०० एकर जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत. बाहेरून आलेल्या भांडवलदार लोकांनी किंवा व्यावसायिकांनी या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे मूळ शेतक-यांच्या जमिनी फार कमी लागणार आहेत. नवीन जागेचा हट्ट कायम ठेवल्यास परवानग्या आणि इतर कामात मोठा वेळ वाया जाण्याचा धोका आहे.
शिवतारे म्हणाले, समृद्धी महार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. पण शासनाने मोबदला जाहीर केल्यावर त्याच शेतक-यांनी स्वतः पुढे येत शासनाला स्वखुशीने जमिनी बहाल केल्या. पुरंदर विमानतळाच्या बाबतीतही शासनाने मोबदला जाहीर केल्यास आणि तो समाधानकारक असल्यास शेतकरी मोठ्या मनाने सकारात्मक होतील.
शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात विजय शिवतारे यांनी यशवंतराव चव्हाण यांची एक सुंदर आठवण शरद पवार यांना करून दिली. उजनी धरण उभारताना शेतकऱ्यांनी आणि विशेषतः वारकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. पण यशवंतरावांनी मनोमन पांडुरंगाची माफी मागितली आणि धरण पूर्ण केले. पुढे त्याच उजनी धरणाने सबंध पश्चिम महाराष्ट्राचे चित्र पालटून टाकल्याचे शिवतारे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांसाठी तेवढा त्रास माझ्यासहीत आपल्यालाही सहन करावा लागेल, असेही शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे.