पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पदवी प्रमाणपत्रासाठी तब्बल ९७ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. पदवी प्रदान समारंभ येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.विद्यापीठांनी वर्षातून दोन वेळा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने पदवी प्रमाणपत्रासाठी आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. विद्यापीठाने१ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत विनाविलंब शुल्कासह तर १ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबरपर्यंत विलंब शुल्कासह आॅनलाईन पद्धतीने पदवी प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारले. विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या ९७ हजार ६६० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे लवकरच या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यासाठी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठाला कुलपती कार्यालयाकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यास नेहमीच शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाते. परंतु, या सोहळ्यास कोणाला बोलवावे, याबाबत अद्याप एकमत झालेले नाही.
डिसेंबरमध्ये पदवी प्रदान, ९७ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 2:13 AM