सिंहगड आणखी सव्वा महिना बंद, दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 05:14 AM2017-09-17T05:14:04+5:302017-09-17T05:14:10+5:30
सिंहगडावर दरड कोसळल्यानंतर दुरुस्तीचे काम कोण करणार, या वादात डागडुजीचे काम दीड महिन्याहून अधिक काळ बंद राहिले; मात्र जिल्हाधिका-यांनी स्वत: यात लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामास मंजुरी दिली.
पुणे : सिंहगडावर दरड कोसळल्यानंतर दुरुस्तीचे काम कोण करणार, या वादात डागडुजीचे काम दीड महिन्याहून अधिक काळ बंद राहिले; मात्र जिल्हाधिका-यांनी स्वत: यात लक्ष घालून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कामास मंजुरी दिली; परंतु काम पूर्ण होण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले. पावसाळ्याबरोबरच दिवाळी सुटीमध्येही सिंहगड बंद राहणार आहे.
दरड कोसळल्याने वनविभागाने सिंहगडावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. गडावर सतत पडणारा पाऊस व धुके यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले. त्यातच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दुरुस्तीचे काम होत नाही, तोपर्यंत गडावरील वाहतूक सुरू करू नये, असे आदेश दिले; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीचे काम तत्काळ सुरू केले नाही. परिणामी वनविभागाने एका खासगी कंपनीकडून रस्त्यावर जाळ्या बसविण्याबाबत पहाणी करून घेतली. दोघांच्या भांडणामध्ये रस्त्याचे काम लांबत असल्याने अखेर जिल्हाधिकाºयांनी स्वत:च्या अधिकारात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली.
उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की, सिंहगडावरील वाहतूक बंद असल्यामुळे पर्यटकांना जाता येत नाही, याचे आम्हाला दुख: होत आहे. काम लवकर सुरू करावे, यासाठी
वनविभागाने पुढाकार घेतला होता.
वनविभागाकडून गडावर जाणाºया दुचाकीसाठी २० रुपये, तर चारचाकीसाठी ५० रुपये आकारले जातात. शनिवारी व रविवारी गडावर येणा-या पर्यटकांची संख्या अधिक असते. गडावरील एकूण वाहनतळाची क्षमता विचारत घेऊन गडावर वाहने पाठविली जातात. गडावर सुटीच्या दिवशी एक हजार ते दीड हजार दुचाकी व ५०० ते ३०० चारचाकी वाहने जातात; परंतु दुरुस्तीमुळे गडावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
दरड कोसळलेल्या भागात जाळी बसविण्याच्या कामास सुरुवात झाली. सुमारे १२५ मीटर भागात जाळी बसविण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागणार आहे; तसेच कोंढणपूर फाटा ते सिंहगडापर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली असून, नोव्हेंबर महिन्यात कामास सुरुवात होणार आहे; परंतु गडावरील रस्ता वाहतुकीसाठी केव्हा सुरू करावा, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारीच घेणार आहेत.
- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण)