त्यांना दिल्लीवारी महत्त्वाची, आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची; अजितदादांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 09:58 AM2023-06-06T09:58:25+5:302023-06-06T10:00:19+5:30
आम्ही विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगले बोलावे, अशी अपेक्षाच आम्ही करत नाही
पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करतात; कारण त्यांना तीच वारी महत्त्वाची वाटत असावी, आमच्यासाठी मात्र ज्ञानोबातुकोबांचीच वारी महत्त्वाची आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर भाष्य केले. मंत्रिमंडळाचा आकार त्यांना योग्य वाटत असेल तर काय करणार असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्डजवळच्या एका कार्यालयात शिरूर, जालना, भिवंडी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, मात्र त्यांना कदाचित २० जणांचेच मंत्रिमंडळ योग्य वाटत असेल, तसेच महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही हेही योग्य वाटत असेल.
विदर्भातील काही जागांचा आढावाही बैठकीत होणार होता, मात्र तेथील नेते दुसऱ्या कार्यक्रमात असल्याने तो झाला नाही. आता १४ जूनला तो होईल. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साेहळा आहे. त्यानिमित्त १० जूनला नगर जिल्ह्यात सभा होणार आहे. पुण्यात आमचे राजकीय वर्चस्व आहे. इथूनही बरेच लोक त्या मेळाव्याला उपस्थित राहतील, असे पवार म्हणाले.
महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. निवडणूक तयारीच्या दृष्टीने आपापल्या पक्षाचा आढावा कसा घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे ते कार्यवाही करतील. एकत्र घ्यायचे निर्णय हे महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतले जातील, असेही पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर, विशेषतः राष्ट्रवादीवर टीका केली होती, त्याबाबत पवार म्हणाले, आम्ही विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगले बोलावे, अशी अपेक्षाच आम्ही करत नाही. ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी महाविकास आघाडीनेच प्रयत्न केले. महिलांना राजकारणात आरक्षणासारखे निर्णय कोणी घेतले हे महाराष्ट्रालाच नाही तर देशाला माहिती आहे. राजकारण किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पवारसाहेब कधीही निर्णय घेत नाहीत, असे पवार म्हणाले.
फाजीलपणा नको, जबाबदारीने काम करा!
तुम्हाला पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचे नाही. तुमच्या भांडणांमुळे तुमची बदनामी नाही तर पक्षाची, पवार साहेबांची बदनामी होते, अशा शब्दात अजित पवार यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना झापले. असेच वागत राहिलात तर मी टोकाची भूमिका घेईन, पदाचा राजीनामा घेईन, असेही पवार यांनी सुनावले.