दोन लाख ३९ हजार शेतक-यांना ८९९ कोटींची कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील अंतिम यादीप्रमाणे रकमेचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:41 AM2017-10-31T00:41:47+5:302017-10-31T00:42:05+5:30
सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या कर्जखात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाख ३९ हजार ७७ शेतक-यांना ८९९ कोटी ११ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली.
पुणे : सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या कर्जखात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाख ३९ हजार ७७ शेतकºयांना ८९९ कोटी ११ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ आॅक्टोबरला मुंबईमध्ये २५ शेतकºयांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे प्रदान केली होती. शासनाने कर्जमाफीसाठी सहकार विभागाच्या खात्यावर चार हजार कोटी रुपये जमा केले. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी करार केला असून बँकेने सेवा विनामूल्य दिली आहे. बँकेला सहकार विभागाने ८९९ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम कर्जमाफीसाठी अन्य बँकांना देण्यासाठी परवानगी दिली.
शुक्रवारपर्यंत ३९२ कोटी रुपयांची रक्कम राज्यातील अकरा बँकांच्या खात्यांवर जमा झाली. त्यात जिल्हा बँकांचा समावेश नव्हता. मात्र, जिल्हा बँकांच्या खात्यावर सोमवारी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. राज्यातील १ लाख ३८ हजार ४०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली असून १ लाख ६७३ शेतकºयांना कर्जमाफी दिली आहे. प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळालेल्यांच्या खात्यांवर २२७ कोटी ९५ लाख रुपये जमा झाले असून ६७१ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी बँकांकडे दिल्याचे झाडे यांनी सांगितले.
उर्वरीत यादीची प्रतीक्षा
शासनाने पहिल्या टप्प्यातील शेतकºयांची अंतिम यादी सहकार विभागाला पाठवून त्यांना पैशांचे वाटप करावे, अशा सूचना पत्र पाठवून दिल्या आहेत. उर्वरीत शेतकºयांची यादी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त होताच कर्जमाफीची आणि प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया २४ तासांच्या आतमध्ये राबविली जाणार आहे.