संभाजी ब्रिगेडचे प्रसारक शरद पोखरकर मारहाण प्रकरणातील आरोपींना अटकेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 06:10 PM2018-02-23T18:10:55+5:302018-02-23T18:10:55+5:30
मंचर येथील संभाजी ब्रिगेडचे प्रसारक शरद पोखरकर यांना मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या सर्व गुंडांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
चाकण : मंचर येथील संभाजी ब्रिगेडचे प्रसारक शरद पोखरकर यांना मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या सर्व गुंडांना अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. 'शिवजयंती' संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात जल्लोषात साजरी झाली. तसेच शिवजयंतीच्या आनंदाला गालबोट लागेल अशा प्रकारची एक घटना मंचर या ठिकाणी घडली.
शरद पोखरकर हे संभाजी ब्रिगेडचे प्रसारक असल्याकारणाने तसेच शिवजयंती निमित्त शाळेतील मुलांचे प्रबोधन व्हावे म्हणून त्यांनी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप केले. याचा राग धरून बजरंग दलाच्या काही गुंडांनी शरद पोखरकर यांच्यावर त्यांचे घरात घुसून भ्याड हल्ला करून त्यांना खूप मारहाण केली आणि तू तुझे सामाजिक प्रबोधन थांबविले नाही, तर तुझा दाभोळकर आणि पानसरे करू अशी त्यांना त्यांचे कुटुंबासमोर धमकी दिली. तरी या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे व पुणे जिल्हा सचिव प्रमोद गोतारणे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना संबंधित गुन्हेगारांवर कारवाई होऊन झालेल्या प्रकारामध्ये शासनाने लक्ष घालावे याबाबत निवेदन दिले.
तसेच हे गुंड जातीयवादी समाजविघातक भाषा बोलत असल्याने या गुंडांचा गोविंद पानसरे यांच्या खुनात हात असण्याची शक्यता असल्याचा संशय येत असल्याने या समाजकंटकांना वेळीच अटक करून त्यांची कसून चौकशी करावी, म्हणजे खरे ते सत्य समोर येईल, असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे व पुणे जिल्हा सचिव प्रमोद गोतारणे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याजवळ व्यक्त केले. तसेच चर्चा करत असताना संबंधित गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात आम्ही दखल घेऊ अशी जिल्हाधिकारी यांनी ग्वाही दिली. पोलीस अधीक्षक पुणे यांना देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देऊस संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा सचिव प्रमोद गोतारणे, पिं.ची.शहर अध्यक्ष प्रविण कदम, शहर कार्याध्यक्ष सतीश काळे, भो.श. अध्यक्ष सुधीर पुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.