चाकण : पुणे-नासिक महामार्गावर प्रवाशांसाठी बसथांबा शेडची मागणी नागरिकांकडून होत आहे. निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये तिष्ठत उभे राहावे लागते. काही प्रवासी तर धोकादायकरीत्या महामार्गावरील दुभाजकांवर उभे राहून वाहनांची वाट पाहतात, त्यांच्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनाही अडथळा होतो. अशावेळी जोरदार वेगाने आलेल्या वाहनांपासून अपघाताचा धोका होण्याचा संभव असतो. तळेगाव चौकातील सिग्नल जवळ महामार्गावर भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा व भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.येथील सिग्नलजवळ भिकारी व त्यांची अल्पवयीन बालके रस्त्यावर धोका पत्करून गाड्या थांबताच भीक मागण्यासाठी आडवी तिडवी पळत असतात, कधी वाहनांना आडवे जाऊन तर कधी दुभाजकावरून पळत असतात, यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे येथील कोहिनुर सेंटरच्या पायऱ्यांवरही भिकारी महिला व लहान बालिका भीक मागत असतात. त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मजूर अड्ड्याजवळील बस थांबा गायब झाला असून नासिक कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने सिग्नल जवळच थांबत असल्याने या रस्त्यावरील बस थांबा प्रवासी वापरात नाही. काही लोक या थांब्याचा वापर पथारी दुकानासारखा करीत आहेत. तळेगाव चौकातील पोलीस चौकी, मजूर अड्डा व नासिक रस्त्यावर सवेरा हॉटेल समोर मोठ्या स्वरूपाचे बसथांबे टाकण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या रस्त्यावरील थांब्यावर कामगार व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच सर्व्हिस रस्त्यावर टपऱ्या, हातगाडया व अवैध वाहनांनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. येथील पोलीस चौकीजवळ थांबा उभारण्याची मागणी होत आहे.
तळेगाव चौकात भिकाऱ्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 9:54 PM