चिमुरड्यांच्या पुस्तकांवर उड्या, श्यामची आई, हॅरी पॉटरला मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 02:36 AM2018-11-15T02:36:20+5:302018-11-15T02:36:42+5:30
बालदिन : श्यामची आई, हॅरी पॉटरला मागणी
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : दिवाळीचा फराळ संपत आला असला तरी सुट्टी आणि बालदिनाचे औैचित्य साधून चिमुरड्यांच्या खाद्य फराळावर उड्या पडल्या. मुलं वाचत नाहीत, ही ओरड खोटी ठरवत अनेक मुलांनी पालकांसह पुस्तकांच्या दुकानात जाऊन आवर्जून खरेदी केली. आॅनलाइन खरेदीच्या माध्यमातूनही बालसाहित्याची मागणी वाढलेली दिसली. श्यामची आई, हॅरी पॉटर, राधाचं जग आदी पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती.
मॉल संस्कृती, मल्टिप्लेक्समधील झगमग, मोबाइल, टीव्हीकडील वाढता कल यामुळे मुले वाचनापासून दूर होत आहेत, हे वास्तव असले तरी वाचनसंस्कृतीचे भविष्य आजही आशादायी असल्याचे चित्र बालदिनी पाहायला मिळाले. मुलांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने बऱ्याच पालकांनी मुलांना इतर भेटवस्तू देण्याऐवजी पुस्तकखरेदीला पसंती दिली. आकर्षक मुखपृष्ठ, सोपी मांडणी, सहजसुलभ भाषा यामुळे मुले पुस्तकाकडे आकर्षित झाली. बालदिनानिमित्त पुस्तकांची दुकाने तसेच आॅनलाइन संकेतस्थळांवर १० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर करण्यात आली होती.
दिलीप प्रभावळकर यांचे बोक्या सातबंडे, राजीव तांबे यांची मांजरू, मोरू, मगरू ही सीरिज, साने गुरुजींचे श्यामची आई, अरुणा ढेरे यांचे सुंदर जग हे, माधुरी पुरंदरे यांचे राधाचं जग या पुस्तकांना बालदिनी जास्त मागणी असल्याचे अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. फास्टर फेणेबद्दल अनेकांकडून विचारणा करण्यात आली. आचार्य अत्रे यांचे कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, ना. धो. ताम्हणकर यांचे गोट्या या पुस्तकांचा खपही वाढला. इतर वेळच्या तुलनेत बालसाहित्याच्या खरेदीत २०-२५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अनुवादित बालसाहित्यालाही मिळतेय पसंती
अनुवादित बालसाहित्यालाही यानिमित्ताने चांगली पसंती मिळाली.
हॅरी पॉटर, फ्रँकलिनचा सेट, हॅनाची सुटकेस या पुस्तकांचा त्यामध्ये समावेश होता.
ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे
माधुरी पुरंदरे यांची सर्व पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित केली असल्याने इंग्रजी माध्यमातील मुलांकडून खरेदी करण्यात आली.
राजा शिवछत्रपती, जाणता राजा, विक्रम वेताळ, बोलकी थैैली, अकबर-बिरबल या पुस्तकांना छोट्या वाचकांनी पसंती दिल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसकडून सांगण्यात आले.
आॅनलाइन
पुस्तक खरेदी
बालसाहित्याची खरेदी आॅनलाइन पद्धतीनेही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. रस्ता, प्रवास, न ऐकलेली गोष्ट, पाऊस ही आॅडिओ बुक्स, डोंगरगावची चेटकीण, सोनूचे साहस, तेनालीरामाच्या चातुर्य कथा अशी पुस्तके आणि किंडल यांना पसंती देण्यात आली. जेरिनिमो सीरिज, हॅरी पॉटर, जंगल बुक या पुस्तकांना नेहमीप्रमाणेच जोरदार पसंती मिळाली.