वेताळ टेकडीमधून जाणाऱ्या ‘टनेल’च्या विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:05 AM2021-02-22T04:05:54+5:302021-02-22T04:05:54+5:30
पुणे - वेताळ टेकडी येथून प्रस्तावित असलेल्या ‘टनेल’ भुयारी मार्गाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी रविवारी टेकडीवर ‘सेव्ह ...
पुणे - वेताळ टेकडी येथून प्रस्तावित असलेल्या ‘टनेल’ भुयारी मार्गाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यासाठी रविवारी टेकडीवर ‘सेव्ह वेताळ टेकडी’ अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शने केली. ही टेकडी जैवविविधतेने नटलेली असून, तिथे कोणताही मार्ग करायला नको, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.
गेली अनेक वर्षांपासून वेताळ टेकडीमधून टनेल करण्याची योजना आहे. १९८७-२००७ च्या डीपीमध्ये या रस्त्याची तरतूद होती. त्यानंतर नवीन डीपीमध्ये देखील तरतूद केली. तसेच दोन रस्तेही (बालभारती आणि एचसीएमटीआर) देखील टेकडीमधून जाणार आहेत. यावर २०१५ मध्ये हरकती मागवण्यात आल्या होत्या. तेव्हा डेक्कन समिती परिसरच्या सुषमा दाते यांनी ७ हजार नागरिकांच्या स्वाक्षरी संकलित केल्या होत्या. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने महापालिकेला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणल्यावरच काम करण्याचे निर्देश दिले आहेत. वेताळ टेकडी ही वन विभागाची जागा असून, त्यासाठी महापालिकेने आता नागपूर येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयात संपर्क साधला आहे.
दरम्यान, हा रस्ता झाला तर टेकडीवरील जैवविविधतेला धोका पोचणार आहे. त्यामुळे तिथे फिरायला येणाऱ्या नागरिकांनी या रस्त्याच्या विरोधात रविवारी निदर्शने केली. यामध्ये उमा डाेंगरे, नवीन शर्मा, असिरा लेले, संस्कृती गोळेकर, जय बोगाटी आदी सहभागी झाले होते.