हडपसर, मुंढवा, भवानी पेठ भागात डेंग्यूचे रूग्ण वाढले; पंधरवड्यात १८८ संशयित रूग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 11:13 AM2019-07-19T11:13:59+5:302019-07-19T11:16:55+5:30
स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तिथेच त्यांची पैदास होते. याबाबत जनजागृती करूनही इमारती, सोसायट्या, बंगले याठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याचे दिसत आहे.
पुणे : जुलैच्या पंधरवडयातच डेंग्यूचे १८८ संशयित रूग्ण सापडले असून, त्यातील १९ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. हडपसर, मुंढवा, घोले रस्ता आणि भवानी पेठ भागात डेंग्यूचे रूग्ण वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये १००० जणांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून, ३५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यंदा पावसाळा सुरू होण्यास जूनचा शेवटचा आठवडा उजाडला. मात्र महिन्याच्या आरंभापासून डेंग्यूच्या तापाच्या संसर्गात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरूवात झाली .जून महिन्यात डेंग्यूच्या १६८ संशयित रूग्णांपैकी ३२ जणांना डेंग्यूची लागण झाली होती.जुलै मध्ये पंधरवड्यातच १८८ डेंग्यूचे संशयित रूग्ण आढळले आहेत. तर मागील आठवड्यात ८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तिथेच त्यांची पैदास होते. याबाबत जनजागृती करूनही इमारती, सोसायट्या, बंगले याठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याचे दिसत आहे. कुठल्याही भागात पाणी साठल्याचे आढळल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. त्यानुसार फवारणी करण्यासाठी कर्मचारी त्या ठिकाणी तात्काळ दाखल होतील असे सांगूनही नागरिकांकडून काणाडोळा केला जात आहे. त्याच्या परिणास्वरूप वर्षाच्या प्रारंभापासून शहरात डेंग्यू ठाण मांडून बसला आहे. जानेवारीमध्ये 86 संशयित रूग्णांपैकी १४ जणांना डेंग्यूची लागण झाली तर जूनमध्ये सर्वाधिक ३२ डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामातही हे प्रमाण कमी झालेले नसल्याचे दिसून आले. मार्च ते एप्रिलमध्ये 25 डेंग्यूच्या रूग्णाची नोंद झाली. वर्षभरात येरवडा-कळस धानोरी प्रभागात डेंग्यूचे १५ , ढोले पाटील प्रभागात १४ , घोले रस्ता- शिवाजीनगर प्रभागात १० , विश्रामबाग-कसबा प्रभागात ८ रूग्ण आढळले आहेत. मात्र मृत्यूची एकही नोंद नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 29 डेंग्यूचे संशयित रूग्ण होते. मात्र पंधरा दिवसातच हा आकडा 188 च्या घरात पोहोचला आहे. जवळपास ४६०जणांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छता राखण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरात वॉर्डनिहाय पाहाणी केली जात आहे.पाणी साठवून ठेवू नये किंवा सोसायटी, बंगल्याच्या आसपास पाणी साठू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन याबाबत जनजागृतीही केली जात आहे. मात्र पुणेकरांकडून अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. घरात पाणी साठवून ठेवणे किंवा झाडांच्या कुंड्यामध्ये अथवा अडगळीच्या भागात पाणी साचणे ही डासाच्या व्युत्पत्तीची ठिकाण आहेत हे नागरिकांनी लक्षात ठेवावे असे आवाहन महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.
-------------------